-
नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. त्यामुळे पक्षासाठी अंतर्गत परीक्षणाचा सल्ला दिला जात असताना आता पुन्हा एक नवा प्रश्न भाजपासमोर उभा राहिला आहे.
-
पुण्यात याआधीच चंद्रकांत पाटलांच्या रुपाने भाजपाने बाहेरून आयात उमेदवार दिल्याचा मुद्दा विरोधकांकडून मोठा केला जात आहे. त्यात आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे नव्याने भर पडली आहे.
-
पिंपरीमध्ये लक्ष्मण जगताप आणि कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी एकीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटप झालेलं असताना भाजपासमोर मात्र नवं कोडं उभं राहिलं आहे.
-
पिंपरीमध्ये भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातही त्याच पद्धतीने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाईल असा अंदाज वर्तवला जात होता.
-
पण पुण्यात घडलं भलतंच. भाजपानं कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा चिरंजीवांना उमेदवारी देण्याऐवजी माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. आणि तिथेच घोळ झाला.
-
भाजपाच्या या निर्णयावर विरोधकांप्रमाणेच पक्षातील कार्यकर्तेही दबक्या आवाजात बोलू लागल्याचा दावा हिंदू महासंघाकडून करण्यात आला आहे. जो न्याय पिंपरीमध्ये लावण्यात आला, त्याच न्यायानं कसब्यातही टिळक कुटुंबातच उमेदवारी द्यायला हवी होती, अशी भूमिका हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी मांडली आहे.
-
ब्राह्मण समाज भाजपाच्या या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा असताना आनंद दवे यांनी उघडपणे तसा दावा केला. ब्राह्मण समाजाने भाजपाच्या पडत्या काळात सर्वाधिक काम केलं, भाजपा जेव्हा ओळखलाही जात नव्हता, पायावर उभा राहात होता तेव्हा ब्राह्मण समाजाने सर्वाधिक काम केलं आहे. मग आता पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर त्या ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? असा प्रश्नच दवेंनी उपस्थित केला.
-
आजपर्यंतची जी परंपरा होती, ती का तोडली जात आहे? सुरक्षित मतदारसंघ आणि हक्काचा मतदार समजून तुम्ही गृहित धरून कुणाला उमेदवारी देत असाल, तर ते चुकीचं आहे, असंही दवे म्हणाले.
-
गेल्या वेळी मेधा कुलकर्णी कोथरूडमधून बाद झाल्या आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे २१ आमदारांपैकी एकही आमदार असा नाही जो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो, असा दावा करत आनंद दवेंनी या प्रकरणाचा थेट चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीशी संबंध जोडला.
-
ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहीत आहेत की हे कुठेतरी चुकतंय. त्याची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र भाजपाच्या लोकांना २-३ तारखेला दिसेल, असं म्हणत आनंद दवेंनी भाजपाला जाहीर इशाराच दिला आहे.
-
आता उमेदवार बदलण्याची वेळ गेली आहे. हिंदू समाज कुणालाही पाठिंबा किंवा विरोध करणार नाही. आम्ही स्वत:चा स्वतंत्र उमेदवार उभा करू, अशी जाहीर भूमिका हिंदू महासंघानं मांडली आहे.
-
भाजपानं जर कोथरूडचा अभ्यास केला असता, तर तिथलं मेधा कुलकर्णींचं मताधिक्य चंद्रकांत पाटलांसाठी २० हजारांवर आलं होतं.कोथरुडचीच पुनरावृत्ती इथे मोठ्या प्रमाणावर होऊ नये, किंवा होऊ शकते असं आम्हाला वाटतंय, असं म्हणत आनंद दवेंनी थेट चंद्रकांत पाटलांचं उदाहरण देत भाजपाला इशारा दिला आहे.
-
एकीकडे दवेंनी जाहीरपणे ही भूमिका मांडली असताना तिकडे कसबा पेठेत अचानक बॅनर्स झळकले आहेत. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा थेट प्रश्नच या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.
-
भाजपानं टिळक कुटुंबाला डावलल्याची टीका विरोधक आता करु लागले आहेत. त्यात खुद्द मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनीही नाराजी बोलून दाखवली आहे. पण त्याचवेळी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं म्हणत सारवासारव करण्याचाही प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय.
-
दुसरीकडे टिळक कुटुंबातील दुसरे नेते आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले रोहित टिळक यांनीही भाजपाच्या निर्णयावर टीका केली आहे.
-
हा (ब्राह्मण) समाज आजपर्यंत भारतीय जनता पाठीशी खूप खंबीरपणे उभा राहिला आहे. तरीदेखील आठ पैकी एकाही ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली नाही. हे खरंच आश्चर्यजनक आहे. आता त्यामागचं कारण काय, त्यांना गृहीत धरलं जातं का? याचे निश्चितपणे परिणाम दिसणार, असं रोहित टिळक म्हणाले आहेत.
-
भाजपानं टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्यामुळे फटका बसू शकतो, असा इशारा विरोधक देत असताना भाजपाकडून मात्र विरोधकांनाच आव्हान दिलंय. आम्ही कसब्यातून उमेदवार बदलतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करणार का? असा प्रश्नच चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
-
या सर्व पार्श्वभूमीवर आज अश्विनी जगताप, हेमंत रासने या दोघा भाजपा उमेदवारांनी पुण्यात अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केलं. “दुःख उराशी बाळगून या निवडणुकीला आम्ही जगताप कुटुंब सामोरे जात आहोत. आज लक्ष्मण भाऊंची उणीव जाणवते आहे. आमचा विजय नक्की होईल”, असा विश्वास लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.
-
दुःखातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. गेली तीस वर्षे आईने पडद्यामागे राहून वडिलांना पाठिंबा दिला. यामुळे आमचा विजय नक्की होईल, असे वाटते. वडिलांनी ज्या प्रकारे जनतेवर प्रेम केले, तसेच प्रेम आमच्यावर करा, असं आवाहन लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या जगताप यांनी केलं आहे.
-
या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांनी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते अजित पवार यांनी निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं ठामपणे स्पष्ट केलं आहे.
-
तर तिकडे हेमंत रासने यांनीही कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केलं.
-
आता दोन्ही बाजू सबुरीनं विचार करून निवडणूक बिनविरोध करणार की सत्ताधारी आणि विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO