-
गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि तिथल्या उमेदवारांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पाच मतदारसंघात निवडणूक झाली तरी नाशिक चर्चेचा विषय ठरलं होतं.
-
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरून पहिल्यांदा काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस बाहेर आली.
-
सुधीर तांबेंना पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी अर्जच दाखल केला नाही. त्याऐवजी थेट सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
-
एबी फॉर्मच चुकीचा आल्याचा दावा नंतर सत्यजीत तांबेंनी केला. यावर नाना पटोलेंनीही माध्यमांशी बोलताना चुकून दुसरी एबी फॉर्म त्यांना गेल्याचा खुलासाही केला. मात्र, त्यानंतर सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची ठाम भूमिका घेतल्याचं ते म्हणाले.
-
सत्यजीत तांबेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आले असले, तरी त्यांनी ठाम राहून अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली.
-
अनेक शिक्षक आणि पदवीधर संघटनांचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा मिळाला. त्यांना भाजपाकडूनही छुपा पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
-
त्यानंतर महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. शुभांगी पाटील यांनीही जोरदार प्रचार करून सत्यजीत तांबेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
-
मात्र, मतमोजणीच्या दिवशी सत्यजीत तांबेंचा मोठा विजय झाल्याचं स्पष्ट झालं. त्याविरोधात शुभांगी पाटील यांना जवळपास निम्मी मतं मिळवता आली.
-
काँग्रेस पक्षाकडून आपल्याला जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आलं होतं. मी त्यासाठीही तयार होतो, तसं पत्रही मी पाठवलं. पण त्यानंतर दोन दिवसांनी दुसऱ्या उमेदवाराला काँग्रेसनं पाठिंबा दिला, असा आरोप सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेऊन केला.
-
राष्ट्रवादी काँग्रसनंही या वादात उडी घेत सत्यजीत तांबेंना उमेदवारी न देणं ही काँग्रेसची चूक होती, असं जाहीरपणे बोलायला सुरुवात केली. खुद्द अजित पवारांनी माध्यमांसमोर तशी प्रतिक्रिया दिल्यामुळे यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले.
-
सत्यजीत तांबे प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये जोरदार गटबाजी चालू असल्याचं बोललं जात असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या चर्चांना बळ मिळालं.
-
जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, असं थोरात म्हणाले.
-
बाळासाहेब थोरात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर नाना पटोलेंशी त्यांचे संबंध ताणले गेल्याचंही समोर येऊ लागलं. नाना पटोलेंच्या कारभारावर टीका करणारं पत्रच थोरात यांनी दिल्ली हायकमांडला लिहिल्याचं बोललं गेलं.
-
या पत्रामध्ये आपल्याला नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण झालं आहे, अशी तक्रार बाळासाहेब थोरात यांनी केल्याचं सांगितलं गेलं. या पत्रावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले.
-
नाना पटोलेंनी यावर प्रतिक्रिया देताना हा पक्षांतर्गत विषय असून तो १३ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नमूद केलं. त्यामुळे पटोले विरुद्ध थोरात असा काँग्रेसमधला वाद असल्यावर शिक्कामोर्तब झालं.
-
हा सगळा वाद सुरू असताना मंगळवारी सकाळी अचानक बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सुरू झाल्या.
-
बाळासाहेब थोरातांनी थेट दिल्ली हाय कमांडला आपला राजीनामा पाठवला असून हायकमांडने अजून त्यांचा राजीवामा स्वीकारलेला नाही. मात्र, थोरात राजीनाम्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.
-
एकीकडे थोरातांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे नाना पटोलेंनी मात्र त्यांचा राजीनामा आपल्याकडे आला नसल्याचं विधान केलं आहे. थोरात आमचे नेते आहेत, त्यांचा काही गैरसमज असेल, तर कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असंही नाना पटोले म्हणाले.
-
माझ्याकडे काँग्रेसची विचारसरणी पुढे नेऊन निवडणुकीत विजयी करण्याचं मोठं काम आहे. त्यामुळे अशा राजकारणासाठी माझ्याकडे वेळ नाही, असं नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना नमूद केलं.
-
अजित पवार याबाबत असं म्हणाले की होय बाळासाहेब थोरात यांनी मला हे सांगितलं की त्यांनी राजीनामा दिला आहे पण त्याचसोबत ते असंही म्हणाले की हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आपण आत्ता संवाद नको साधुयात त्यामुळे मी पुढे त्यांना फार काही विचारलेलं नाही.
-
दरम्यान, सत्यजीत तांबेंनी बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे, असं तांबे म्हणाले.
-
दरम्यान, बाळासाहेब थोरातांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. “आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम; आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केलं आहे.
-
या सर्व राजकीय घडामोडींनंतर आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार अशोक चव्हाण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. थोरातांची मनधरणी करण्याचा प्रयत्न चव्हाणांकडून सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
-
“बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे”, असं चव्हाण म्हणाले आहेत.
-
थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नेमकं आता काँग्रेसमधलं हे अंतर्गत राजकारण कुठल्या दिशेनं जाणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”