-
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
-
निवडणूक आयोगाने मिंधे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला असला तरी स्व. बाळासाहेबांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक धनुष्यबाण दाखवले.
-
निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
-
शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच आहे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू.
-
आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही.
-
“आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की, निवडणूक आयोग गडबड करणार त्यामुळे लवकर निर्णय द्यावा. आमचा सर्वोच्च न्यायालयावर नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे.”, असंही ते म्हणाले.
-
“न्याय यंत्रणा आपल्या दबावाखाली कशी येईल, त्यासाठी मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री बोलत आहे. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. देशातील लोकशाही संपलेली आहे. आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. येत्या २१ तारखेपासून याबाबत सलग सुनावणी सुरू होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही म्हणून आता बाळासाहेब चोरले का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
लोकशाही सक्षम व्हावी असे वाटत असेल तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत त्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने निकाल दिला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणूक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते. पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील.
-
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी पेटती मशाल हाती घेत मशाल मोर्चा काढला.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य