-
यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, थोड्या मतांनी पराभव झाला होता. एकदा पराभव झाल्यावर तो उमेदवार परत काम करत नाही. मात्र, आपल्याला आमदार व्हायचं आहे, ही जिद्द ठेवली होती, असं मत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘झी २४ तास’च्या तास’च्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोलत होते.
-
रवींद्र धंगेकर म्हणाले, “शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो आणि मनसेत प्रवेश केला. आमदार व्हायचं असल्याने मागील महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”
-
“मला लोकं म्हणायची, काँग्रेसमधून लोकं बाहेर पडत आहे. पण, तुम्ही काँग्रेसकडे कसं चालला. मला माहिती होतं, काँग्रेशिवाय आमदार होऊच शकत नाही. हे तेव्हा जाणलं होतं. म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला,” असं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं.
-
“त्यानंतर राज ठाकरेंशी संवाद केला. त्यांच्याबद्दल आदर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वाबरोबर काम केलं आहे. ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. राज ठाकरेंशी आजही चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण कधी टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो,” असं धंगेकर यांनी म्हटलं.
-
आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का? असं विचारल्यावर धंगेकर म्हणाले, “राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे,” असं धंगेकरांनी सांगितलं आहे.
-
काँग्रेस सोडणार का? असं विचारलं असता रवींद्र धंगेकर म्हणाले, “नाही, काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारांचा पक्ष आहे. लहान वयात शिवसेनेत गेलो. शिवसेना आणि मनसेत असताना मानसन्मान मिळाला.”
-
“काँग्रेसमध्येही मानसन्मान मिळाला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आभार मानलेच पाहिजे.”
-
“संग्राम थोपटेंनी दत्तक म्हणून कसबा पेठ मतदारसंघ घेतला होता. त्यांचे वडील स्वर्गीय अनंतराव थोपटे यांनी पालकमंत्री असताना वसंततात्या थोरात यांना निवडून आणण्यात महत्वाची जबाबदारी बजावली होती.”
-
“आज संग्राम थोपटेंनी ती कामगिरी बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खूप प्रेम केलं. कार्यकर्त्यांवर कसं प्रेम केलं जातं, हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे,” अशी प्रांजळ भावना रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
-
थडग्यातून मुस्लीम आणून मतं मिळवली, असा आरोप झाला. याबद्दल विचारल्यावर रवींद्र धंगेकरांनी सांगितलं, “मला ब्राम्हण समाजाने मतं दिली. जेव्हा एखादा पक्ष निवडणूक हरत असतो, तेव्हा हे मुद्दे येतात. मी सर्वसमावेशक कार्यकर्ता आहे.”
-
“मला हिंदुत्व कोणी शिकवू नये. शिवसेना प्रमुखांच्या पठडीतला मी कार्यकर्ता आहे. आमच्या आजी-आजोबांनी हिंदुत्व शिकवलं आहे. हिंदू म्हणण्यासाठी कोणाचं प्रमाणपत्र हवं आहे का? कोणी दुकानं काढली का? हा हिंदू हा मुस्लीम आहे,” असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
-
“हिंदुत्वाची दुकानं घेऊन फिरणाऱ्यांचा, तो राजकीय विषय असतो. आम्ही हिंदू आहोत, मी क्षत्रिय आहे, प्रभू रामचंद्र आमचे आहेत. हे कोणीही आमच्या ह्रदयातून घेऊ शकत नाही. यांची मक्तेदारी नाही. मुस्लीम समाजाचा अनादार करणं, हे हिंदू धर्माने शिकवलं नाही,” असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral