-
छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी ( २ मार्च ) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लावली. तेव्हा सर्व नेत्यांना व्यासपीठावर बसण्यासाठी एकासारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. पण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती.
-
यावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
“काहींनी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरून उलट-सुलट चर्चा केल्या. याची मला गंमत वाटत आहे. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पाठीची एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना पाठीमागे ताठ असणारी खुर्ची ठेवली होती. आमच्यात असं वेगळं काही नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
-
“आमच्यात बसण्यावरून भेदभाव असल्याच्या चर्चा काहींनी केल्या. मात्र, असं काहीही नाही. आम्ही एकोप्याने जात आहोत,” असंही अजित पवारांनी म्हटलं.
-
“आमच्या सभेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या भाषणापासून शेवटच्या भाषणापर्यंत लोक थांबली होती. आता दुसरी सभा नागपुरला होणार तर तिसरी सभा १ मे ला मुंबईला यानंतर पुण्याला होणार आहे,” असे अजित पवार म्हणाले.
-
“आम्ही सभेसाठी काही धोरण तयार केली आहेत. यात प्रत्येक पक्षातील दोन-दोन नेत्यांना बोलण्याची संधी दिली आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून चर्चा सुरु आहे. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, “२०१४ साली नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी निवडून दिलं होतं का? त्यांनी २०१४ साली स्वत:चा करिष्मा निर्माण केला होता.”
-
“जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे.”
-
“देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो,” असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड