-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवारांनी मंगळवारी ( २ मे ) केली होती. शरद पवारांच्या या निर्णयामुळे नेते, कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
-
पण, आज ( ५ मे ) शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “मी निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं.”
-
“त्याचबरोबर देशभरातून आणि विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, असा आग्रह धरला.”
-
“माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने आणि विनंत्या यांचा विचार केला.
-
“तसेच, पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी केली.
-
शरद पवारांच्या निर्णयावर जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. “देशातील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शरद पवार यांचं मनपूर्वक आभार. त्यांची देश, महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला गरज आहे,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
-
अजित पवार आणि धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत अनुपस्थित होते? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “सगळेच सर्व ठिकामी असू शकत नाहीत. सकाळी त्यांची जबाबदारी होती, त्याप्रमाणे बैठकीत भाग घेतला. शरद पवारांच्या घरी जाऊन चर्चा केली. त्यानंतर सर्वजण निघून गेले होते.”
-
“मलाही पत्रकार परिषद होत आहे, याची माहिती उशीरा मिळाली. त्यामुळे पत्रकार परिषदेला उशीरा आलो. पत्रकार परिषद शरद पवारांची होती. पक्षाचे अध्यक्ष असल्याने मी आलो,” असं जयंत पाटील म्हणाले.

लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम