-
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होतं. मात्र, या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळल्या आहेत. आपण कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे पाहिलं नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. त्या वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
-
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “२०१९ साली मी भाजपाची उमेदवारी होती. तेव्हा माझा पराभव झाला. माझ्या पराभवानंतर भाजपात अनेक निर्णय झाले. त्या निर्णयात मी सामील झाले नसल्याने आणि तिकीट नाकारल्याने पक्षातून बाहेर जाणार अशा चर्चा रंगल्या.”
-
“पण, दसरा मेळावा, ३ जून आणि १२ डिसेंबरला मी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. सातत्याने माझी भूमिका मांडणे माझ्या नैतिकतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ‘पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या, तर चांगलं आहे’ अशी विधाने केली. या गोष्टीला मी हलक्यात घेतलं,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
-
“अलीकडे आलेल्या एका बातमीने मला अंर्तमुख केलं. त्यात मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, असं सांगण्यात आलं. मी कधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे पाहिलं नाही. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता.”
-
“परंतु, माध्यमांनी कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी केलेल्या कथनाचे पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील. माझे करियर कवडीमोलाचे नाही,” असेही पंकजा मुंडेंनी म्हटलं.
-
“मी आमदार झाल्यावर पहिल्या मुलाखतीत बोलले होते की, राजकारणात ज्या विचारसरणीला ठेवून मी आले. त्याच्याशी मला जेव्हा प्रतारण करावी लागेल, चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका विश्रांतीची गरज आहे. एक-दोन महिने मी सुट्टी आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतंय, यावर विचार करण्याचीही गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”