-
केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. “सहकार हे एकमेव क्षेत्र प्रत्येक गावात आणि खेड्यातील प्रत्येक घरात पोहचले आहे,” असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
-
अजित पवार म्हणाले, “सहकार हे एकमेव क्षेत्र प्रत्येक गावात आणि खेड्यातील प्रत्येक घरात पोहचले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सहकार विभागाने योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांनी या मंत्रालयाचे नेतृत्व सांभाळलं आहे.”
-
“सहकारातून समृद्धी अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्या घोषणेअंतर्गत अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय काम करत आहे. याला आमचा पाठिंबा असेल, असा विश्वास मी अमित शाह यांना देतो,” असं अजित पवार यांनी म्हटलं.
-
“अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितलं.
-
“मी एका कारखान्याचे नेतृत्व करतो. तिथे शेतकऱ्यांना २८५० रुपयांची एफआरपी मिळाली आहे. आणि फायनल भाव ३३५० रुपयांचा मिळाला आहे. मी साखर आयुक्तांना भेटून शेतकऱ्यांना टनाला ५०० रुपये जास्त मिळत असल्याची माहिती देणार आहे. याला इन्कम टॅक्स द्यावा लागता असता. पण, अमित शाहांमुळे तो इन्कम टॅक्स माफ झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.
-
“‘अजित पवारांनी असा का निर्णय घेतला?’ हा प्रश्न अनेकांना पडतो. पण, हे करण्याचं धाडस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हेच देशाचं नेतृत्व करू शकतात,” असं कौतुक अजित पवारांनी केलं आहे.
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य