-
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळांचं वक्तव्य आश्चर्यकारक आहे. मंत्रीमंडळ बैठकीत आपण एकत्र निर्णय घेतला. मग, आपले सहकारी वेगळे मत कसे काय मांडू शकतात? असा सवाल शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
-
‘मनोज जरांगे-पाटील यांना ‘सर सर’ म्हणणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर विश्वास नाही’ असंही छगन भुजबळांनी म्हटलं होतं. याबद्दल विचारल्यावर शंभूराज देसाई म्हणाले, “सरकारच्या विनंतीनंतर माजी न्यायमूर्ती जरांगे-पाटीलांना भेटण्यासाठी गेले होते. पण, सरकारमधील मंत्रीच माजी न्यायमूर्तींच्या भेटीवर आक्षेप घेतात, हे बरोबर नाही.”
-
“ओबीसी समाजानं कुठेही गैरसमज करून घेण्याचा प्रयत्न करू नये. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही. हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.”
-
“छगन भुजबळांनी अशाप्रकारची वक्तव्ये करून जाती-जातींतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये,” असं देसाईंनी सुनावलं आहे.
-
“भडक वक्तव्य करण्याची सवय छगन भुजबळांना आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आहे.”
-
“सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच भडक वक्तव्ये करून परिस्थिती भुजबळांनी परिस्थिती चिघळवू नये,” असेही शंभूराज देसाईंनी म्हटलं.
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य