-
तेलगीने रात्रीत एका बारमध्ये १ कोटी रूपये उधळल्याची माहिती होती. पण, मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं अच्छे दिल आलेत, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे.
-
संजय राऊत यांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचे कॅसिनोतील फोटो ट्वीट केले होते. यानंतर कुटुंबाबरोबर असल्याचं बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. अशातच संजय राऊत यांनी प्रसारमाध्मयांशी संवाद साधताना बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.
-
संजय राऊत म्हणाले, “मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचं. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल.”
-
“माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
-
“मी कधी कुणावरही व्यक्तीगत टिप्पणी करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल. आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.
-
भाजपा महाराष्ट्रानं आमदार आदित्य ठाकरेंचा पेय पितानाचा एक फोटो ट्वीट केला होता. तसेच, ‘आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?’ असा सवाल उपस्थित केला होता. यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आदित्य ठाकरेंनी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांची भेट घेणं चुकीचं आहे का? भाजपावाले मूर्ख आहेत. पंतप्रधान मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात. मोदींचा आणि आदित्य ठाकरेंचा ब्रँड सेम आहे,” असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर