-
छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपानं मुसंडी मारली आहे. तर, तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली आहे. तीन राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्याकर्त्यांना संबोधित केलं. आजच्या हॅटट्रिकने २०२४ मधील विजयाच्या हॅटट्रिकची हमी दिली, असं पंतप्रधानांनी म्हटलं.
-
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्वक आहे. आज ‘सबका साथ, सबका विकास’ची भावना जिंकली आहे. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे.”
-
“देशातील तरूणांमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा राग आहे. ज्या सरकाराने तरुणांविरोधात काम केलं, ते सत्तेतून बाहेर पडले आहे,” असं मोदींनी सांगितलं.
-
“देशातील तरूणांमध्ये विश्वास वाढतोय. भाजपा त्यांच्यासाठी काम करतो, हे तरूणांना माहिती आहे. भाजपा सरकार तरूणांच्या हिताचे काम करत असून नवीन संधी निर्माण करत आहे,” असं मोदींनी म्हटलं.
-
“देशातील आदिवासी समाज भाजपाकडे आशेने पाहतोय. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला आदर दिला नाही. त्यामुळे आदिवासी समाजानं काँग्रेसला हद्दपार केलं. आदिवाशी समाजाला विकास हवा आहे, त्यांना भाजपावर विश्वास आहे,” असं मोदी म्हणाले.
-
“या निवडणुकीत देशाला जातीजातींमध्ये वाटण्याचा खूप प्रयत्न झाला. पण, मी सातत्याने म्हणत होतो की माझ्यासाठी देशात चारच जाती सर्वात मोठ्या आहेत. जेव्हा मी या चार जातींबाबत बोलतो, तेव्हा आपली स्त्रीशक्ती, युवा शक्ती, आपले शेतकरी आणि आपले गरीब कुटुंब या चार जातींना सशक्त केल्यामुळेच फक्त देश सशक्त होऊ शकतो”, असं मोदींनी सांगितलं.
-
“आपले ओबीसी, आदिवासी सहकारी याच वर्गातून येतात. या निवडणुकीत या चारही जातींनी भाजपाच्या योजना आणि रोडमॅपबाबत मोठा उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब, तरुण, आदिवासी, शेतकरी हे सांगतोय की तो स्वत:च जिंकला आहे. आज देशातली स्त्रीशक्ती भाजपाबरोबर आहे”, असं नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं.
-
तेलंगणामध्ये पराभव झाला असला, तरी भाजपाचा आलेख कायम वर जाणारा असल्याचं मोदी म्हणाले. “तेलंगणात प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा आलेख सातत्याने वर चढत चालला आहे. मी तेलंगणाच्या लोकांना विश्वास देतो की भाजपा तुमच्या सेवेत कोणतीही कसर ठेवणार नाही”, असं मोदी म्हणाले.
-
“भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्या मनात थोडीही देशभक्त दिसत नाही. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला हद्दापर केलं आहे. लोकशाहीच्या हितासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना माझा आणखी एक सल्ला आहे, कृपया देशविरोधी, विभाजन आणि देशाला कमकुवत करणारे राजकारण करू नका,” असेही मोदींनी म्हटलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”