-
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशात हालचालींना वेग आला आहे. अशातच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लोकसभेच्या २५ जागांवर दावा सांगितला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना डिवचत मोठा दावा केला आहे.
-
“महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होईल. तसेच, आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहोत,” असं संजय राऊतांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
-
संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही ( २१ डिसेंबर ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.”
-
“महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
-
“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय श्रेय घेण्याचा सोहळा बनला आहे,” असे म्हणत राऊतांनी भाजपाला लक्ष्य केलं.
-
“राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान फार मोठं आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत गेले, तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार होईल. त्यामुळे ज्यांचं योगदान आहे, त्यांना सन्मानाने कधीच बोलावणार नाहीत. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची मालमत्ता नाही. राजकीय सोहळा झाल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन धार्मिक सोहळा करू,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य