-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भाजपाच्या बाजूने देशभरात वातावरण निर्मिती झाली. आगामी निवडणुकीत भाजपाचीच चलती असेल असा अंदाज घेऊन नितीश कुमार यांनी बाजू बदलण्याचा निर्णय घेतला असावा, अशी एक शक्यता वर्तविली जात आहे.
-
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केल्यानंतर बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नितीश कुमार यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. तसेच याआधी युपीएच्या काळातच आपण ठाकूर यांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी केली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
-
कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्याची घोषणा केल्यानंतर नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ते कसे समाजवादी विचारांवर चालत आहेत, हे सांगितले. हे सांगताना त्यांनी घराणेशाहीवर टीका केली.
-
या टीकेला लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य हिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रत्युत्तर दिले. “काही लोक स्वतःला समाजवादी म्हणून घेतात, पण त्यांची विचारधारा वाऱ्यासारखी बदलत असते, अशी टीका रोहिणी आचार्य यांनी केली.
-
रोहिणी आचार्य यांच्या पोस्टमुळे वाद उद्भवल्यानंतर त्यांनी ती तात्काळ डिलीटही केली. पण तोपर्यंत आरजेडी आणि जेडीयू पक्षात वादाची ठिणगी पडली होती.
-
आणखी एक कारण म्हणजे नितीश कुमार यांनी इंडिआ आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका घेतली. पण त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार करण्यात आले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ होते. इंडिया आघाडीत आपल्या नेतृत्वाला महत्त्व नाही, अशी त्यांची भावना झाली होती, असे सांगितले जाते.
-
इंडिया आघाडीत असताना नितीश कुमार यांना पाच जागा जिंकणेही अवघड जाईल, असे जाहिर विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांची अस्वस्थता आणखी वाढली.
-
इंडिया आघाडीत जागावाटपाच्या चर्चेला उशीर लावल्याचा आरोप करून नितीश कुमार दुसऱ्या, तिसऱ्या बैठकीपासूनच नाराज होते. काँग्रेस निर्णय घेण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला होता.
-
दरम्यान राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षाची जवळीक वाढत असल्यामुळेही नितीश कुमार अस्वस्थ होते.
-
तेजस्वी यादव हे जनता दल (यूनायटेड) पक्षात फूट पाडतील अशी भीती नितीश कुमार यांना होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांना बाजूला सारून स्वतःच्या हातात पक्षाची कमान घेतली.
ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन ते पुन्हा एकदा भाजपाबरोबर जात आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला, त्यामागील महत्त्वाची कारणे जाणून घेऊया. (सर्व फोटो – PTI / ANI)
Web Title: Reason behind nitish kumar again joins hands with bjp kvg