-
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. या प्रचारदरम्यान त्या भाजपावर जोरदार टीका करताना दिसून येत आहेत.
-
नुकतेच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील होटगी गावात चौकसभा घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नाही. त्यामुळे मला ईडी-बिडीची भिती नाही. मी भाजपा विरोधात बोलणारच.”
-
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, यंदाची निवडणूक ही ‘करेंगे या मरेंगे’ अशी आहे. लोकशाही आणि संविधान संपाविण्याचा डाव भाजपा करत आहे. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली.
-
एक महिन्यापासून काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. एक महिन्यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आले. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही अटक करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत. त्यांचे माईक बंद केले जातात. ही लोकशाही आहे की हुकूमशाही? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
-
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने दोन रुपयांनी पेट्रोलचे दर कमी केले. जनतेला भिकारी समजून तुम्ही भीक देत आहेत का? तरी पण आपण जर भाजपला मतदान केले तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पाच आमदार आणि एक खासदार आहे. यांना उघडे पाडण्यासाठी आणि वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी मी गावोगावी फिरत आहे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
-
“मोठ्या थाटामाटात मोदी सोलापुरात आले होते, तुम्ही मोदींकडे बघूनच २०१९ साली महाराजांना मतदान केले. पण महाराज विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोलापूरसाठी काय केले. तुम्ही मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपले होते आणि काम करणारे लोक मागे राहतात, असेही त्या म्हणाल्या.
-
जी लोक तुम्हाला जातपात – धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्यास प्रवृत्त करतात ते लोकशाहीच्या विरोधात असतात. लोकांलोकांमध्ये भांडण लावून आणि आंदोलकांमध्ये त्यांची माणसं घुसवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही त्यांची खेळी आहे, असेही त्या म्हणाल्या.
-
दरम्यान प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच त्यांच्या वाहनावर पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
-
‘एक मराठा-लाख मराठा’अशा घोषणा देत आपल्या मोटारीवर हल्ला केला. हा हल्ला आपल्यावरच होता. परंतु यात आपण बचावल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केला, असा आरोप त्यांनी केला.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”