-
आज मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. आजच्या या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
-
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
-
फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरे म्हणाले.
-
यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेण्यामागचे कारणही सांगितले.
-
“मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आपण एकत्र आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण माझी प्रतिक्रिया होती की काय केलं पाहिजे? असं वर्ष दीडवर्षे एकत होतो. पण मला समजेना. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सांगत होते. परंतु, एकत्र आले पाहिजे म्हणजे काय. मग मी अमित शाहांशी भेटायचा निर्णय घेतला”, असं ते म्हणाले.
-
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. “आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला होता. आज हे विरोधात बोलत आहेत. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्याबरोबर का आला नाहीत? असे राज ठाकरे म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी माध्यमांमध्ये सुरु असलेल्या विविध चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, ”अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात आलं. मग मला असे वाटतेचा एपिसोड कसा पुढे न्यायचा? मग राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो.”
-
”माझ्या घरी ३२ आमदार, सहा सात खासदार एकत्र बाहेर पडू वगैरे ठरलं होतं. मी नावं घेत नाही. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. माझ्या मनात विचार नाही. पण मी पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. ही गोष्ट मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली होती”, असेही राज ठाकरे म्हणाले.
-
”बाळासाहेब ठाकरेंशिवाय यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. पण त्याला काही कळलंच नाही असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी महाराष्ट्र निर्माण सेना हे अपत्य जन्माला घातलं आहे. मी याच पक्षाचा प्रमुख राहणार”, असं राज ठाकरेंनी म्हटलं
-
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं. ”निवडणूक होणार हे माहिती असताना निवडणूक आयोगाला मनुष्यबळ उभं करता येत नाही का? डॉक्टर आणि रुग्नसेविका निवडणुकीची कामे करण्यासाठी असतात का?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
-
तसेच डॉक्टर आणि रुग्नसेविकांनी निवडणुकीची कामे करू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
-
दरम्यान भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभच्छाही दिल्या. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्यांनाच मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. असे ते म्हणाले.

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?