-
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी काल पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी अतुल देशमुख यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.
-
यावेळी शरद पवार यांनी भाजपाचे नेते आणि माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांचाही दोन-चार दिवसांत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले.
-
पत्रकार परिषदेत शरद पवारांना विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. भाजपाबरोबर येण्यास शरद पवार ५० टक्के अनुकूल होते, असे विधान प्रफुल पटेल यांनी केले होते. हा दावा शरद पवारांनी फेटाळून लावला. मी अजूनही भाजपाबरोबर गेलेलो नाही, असे पवार म्हणाले.
-
शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. मुलगा, बाप, मुलगी यांना आतापर्यंत निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या. त्याही पवारच आहेत, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
-
या आवाहनाची हवा काढताना शरद पवार म्हणाले की, मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे. त्यामुळं शरद पवार यांनी सुनेत्रा पवार बाहेरच्या असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जाते.
-
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. त्यांच्या भूमिकेचा अन्वयार्थ कसा लावाल? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.
-
यावर शरद पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी मागच्या १०-१५ वर्षांत तीन-चार निर्णय घेतले. त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला म्हणतात, मात्र संपूर्ण चित्र दोन-चार दिवसात स्पष्ट होईल.
-
राज ठाकरेंची भूमिका सामान्य माणसांना कळलेली नाही, असाही एक प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले, मीही सामान्य माणूस आहे. पवारांच्या या मिश्किल टोल्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकला.
-
एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपामध्ये जात आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, खडसेंना सत्ताधाऱ्यांनी खूप त्रास दिला. त्यांच्या इतक्या चौकश्या सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, त्यामुळे त्यांना कुटुंब चालवणं अवघड केलं. त्यामुळे त्यांना सोयीस्कर वाटत असेल तिथे जावे, असे मीच सांगितलं असल्याचं पवार म्हणाले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख