-
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून धक्कादायक निकाल पुढे आले आहे. मोठमोठ्या दिग्गजांना २०२४ च्या या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर पहिल्यांदाच झालेली ही लोकसभा निवडणूक अनेकांना डोकेदुखी ठरली आहे. अनेक गोष्टींचा परिणाम या निवडणुकीच्या मतदानात होता, त्याप्रमाणे निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल आले आहेत, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. दरम्यान राज्यातील कोणत्या महिला खासदार आता संसदेत जाणार आहेत आणि कोणत्या महिला खासदार आता घरी बसणार आहेत, हे आपण जाणून घेऊया.
धुळे मतदारसंघातून शोभा बच्छाव या खासदार झाल्या आहेत. त्यांच्या बाजूने या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यातल्या लढतीत भामरेंचा पराभव झाला आहे. -
तर स्मिता वाघ या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कारण पवार यांना पराभूत करून जळगाव मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत.
-
भाजपा उमेदवार रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून विजयी झाल्या. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला.
-
प्रतिभाताई धानोरकर या चंद्रपूर मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवारमु यांचा पराभव केला.
-
वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून उज्वल निकम यांना पराभूत करून विजयी झाल्यात.
-
प्रणिती शिंदे या सोलापूरमधून भाजपा उमेदवार राम सातपुते यांचा पराजय करून विजयी झाल्यात.
-
तर बारामती मधून सुप्रिया सुळे या ननंद भावजयीच्या सामन्यातून सुनेत्रा पवार यांना पराभूत करून पुन्हा एकदा विजयी झाल्या आहेत.
-
दरम्यान २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या निकालातून विजयी होऊन खासदार झालेल्या या महिला खासदार आता घरी बसणार.
हिना गावित या नंदुरबार मधून लोकसभा निवडणूक लढवत होत्या त्यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. -
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा याही यावर्षी निवडणुकीच्या मैदानात होत्या. भाजपाने त्यांना तिकीट दिलं होतं. स्वतः नरेंद्र मोदी अमित शहा यांनीही त्यांच्यासाठी सभा घेतल्या, परंतु त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.
-
शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी यांना डावलून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने भावना गवळी यांना तर तिकीटच मिळाले नाही.
-
दिंडोरी मतदार संघामधून भारती पवार यांचा पराभव झाला आहे. पवार यांच्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
-
मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांमध्ये पुनम महाजन यांना डावलून भाजपाने उज्वल निकम यांना तिकीट दिल्यामुळे त्यांना यावेळेस उमेदवारी मिळाली नाही.
-
बीड मतदार संघात प्रीतम मुंडे २०१९ साली खासदार झाल्या, परंतु २०२४ मध्ये त्यांच्या ऐवजी बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु अटीतटीच्या सामन्यात पंकजा यांचा पराभव झाला आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”