-
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच एनडीएच्या घटकपक्षांची आणि खासदारांची बैठक संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीए संसदीय मंडळाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले.
-
या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, सल्लागार मंडळातील नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या या दोन्ही नेत्यांची नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भेट घेतली. २०१९ पासून हे दोन्ही नेते भाजपाच्या कुठल्याही मंचावर आलेले नाहीत.
-
काही महिन्यांपूर्वीच लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली होती.
-
दोन टर्म पूर्ण बहुमताचे सरकार चालविल्यानंतर यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचा पाठिंबा असलेले आघाडी सरकार चालवावे लागणार आहे. त्यासाठी आघाडीतील प्रत्येक नेत्याचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न आजच्या बैठकीतून झाला.
-
आघाडीचे सरकार असल्यामुळे तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे.
-
आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ४८ मिनिटांच्या भाषणात जवळपास ३९ वेळा एनडीए/ गठबंधन/ युती या शब्दांचा प्रयोग केला. यातूनच आता त्यांना एनडीएची किती निकड वाटते, हे ध्यानात येते.
-
लोकसभा निवडणुकीत यंदा जनतेने भाजपाच्या पारड्यात बहुमत टाकले नाही. भाजपा पक्ष २४० वर मर्यादीत राहिला. बहुमतासाठी त्यांना आणखी ३२ खासदारांचा पाठिंबा लागणार आहे.
-
आजच्या बैठकीत एनडीएबद्दल भरभरून बोलत असताना आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांचेही मोदींनी कौतुक केले. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे आपापल्या राज्यात कसे सुसाशन राबवत आहेत, याचा उल्लेख केला.
-
तसेच त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. आमच्या जेवढ्या जागा या निवडणुकीत निवडून आल्या आहेत, तेवढ्या तर काँग्रेसच्या तीनही निवडणुकांची बेरीच केली तरी होत नाहीत. निकालानंतर भाजपाचा पराभव झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले, पण त्यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.
-
नरेंद्र मोदी आता ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर किती मंत्री शपथ घेतात, याची माहिती कळू शकलेली नाही.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर