-
बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून राजधानी ढाकामधून पळ काढला आहे.
-
दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकेर उज झमान यांनी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन सोडल्याचे जाहिर केले, तसेच आता लष्कराच्या मदतीने अंतरिम सरकार लवकरच स्थापन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
-
झमन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही देशात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू. नागरिकांना आवाहन आहे की, आता त्यांनी हिंसाचार थांबवावा.
-
बांगलादेशमध्ये तणावाची परिस्थिती पाहता भारतीय सीमा सुरक्षा दलाने हाय अलर्ट जाहिर केला असून भारत आणि बांगलादेशच्या सीमांवर सुरक्षा वाढविली आहे. तसेच बीएसएफचे महासंचालक कोलकाता येथे पोहोचले आहेत.
-
माध्यमातील माहितीनुसार शेख हसीना यांनी आज (दि. ५ ऑगस्ट) दुपारी बांगलादेशमधून दुपारी २.३० वाजता प्रस्थान केले. त्यांच्याबरोबर त्यांची लहान बहीण शेख रेहाणाही होत्या.
-
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या आरक्षणावरून गेल्या काही आठवड्यांपासून बांगलादेशमध्ये असंतोष पसरलेला असून हिंसाचारही झाला. आज हजारो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानावर चाल करून आल्यानंतर शेख हसीना तिथून निसटल्या.
-
आंदोलकांनी जून महिन्यात राखीव जागांविरोधात शांततेत आंदोलन सुरू केले होते. मात्र पोलिसांच्या आणि प्रतिस्पर्धी आंदोलकांच्या झटापटीत काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक उग्र बनत गेले. मागच्या दोन दिवसांत १०० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
-
आंदोलकांनी लोकांना ढाकावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
-
एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा सल्लागारांच्या सल्ल्यानंतर शेख हसीना यांनी देशाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना विनातयारीनिशी तात्काळ देश सोडावा लागला.
-
शेख हसीना यांनी देश सोडल्याचे कळताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. रस्त्यांवर झेंडे फडकवून वाजत-गाजत आनंद व्यक्त केला. आंदोलकांच्या टोळक्यांनी शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबीर रहमान यांच्या पुतळ्याचीही तोडफोड केली.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा