महाराष्ट्रामध्ये भाजप रूजवण्यात आणि पक्षासाठी जनाधार निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण वाटा असणारे गोपीनाथ मुंडे यांचा आज पहिला स्मृतीदिन. या स्मृतीदिनानिमित्त जागवलेल्या त्यांच्या काही खास आठवणी… -
विरोधी पक्षनेता म्हणून समुद्रात बुडवलेला एनरॉन प्रकल्प सत्तेवर आल्यावर पुन्हा वर काढण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त झाला तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगीच होती. मुंबईतील गुंडगिरीचा कणा मोडला गेला तो त्यांच्याच काळात. पुढे १९९९ साली सेना-भाजपची सत्ता गेली. परंतु तरीही मुंडे यांचा अधिकार गेला, असे झाले नाही.
-
महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम स्थान असलेल्या शरद पवार यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीतला एक काळ विशेष गाजला होता. मुंडे यांचे गोपीनाथराव व्हायला प्रारंभ झाला तो नव्वदीच्या सुरुवातीस. तोपर्यंत महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असे समीकरण होते. ते पहिल्यांदा भंगले मुंडे यांच्यामुळे. पवार यांचे समाजविघातक घटकांशी असलेले कथित संबंध, जमीनजुमल्यांचे वादग्रस्त व्यवहार आणि त्यांच्या सरकारने हाती घेतलेला एन्रॉन प्रकल्प यांविरोधात मुंडे यांनी शब्दश: रान उठवले. या निमित्ताने त्यांनी किती वेळा महाराष्ट्र पिंजून काढला असेल यास गणती नाही. त्याचमुळे महाराष्ट्राचा कानाकोपरा मुंडे यांना माहीत होता आणि त्याबाबत पवारांच्या खालोखाल, किंबहुना बरोबरीने, त्यांची ख्याती होती.
त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. गोपीनाथ मुंडे आणि घड्याळ यांचे नाते कधी जमले नाही. एक घड्याळ म्हणजे वेळ. ते कार्यक्रमाला कधी वेळेवर गेले नाहीत आणि दुसरे घड्याळ म्हणजे राष्ट्रवादीचे. त्याच्याशीही त्यांचे कधी जमले नाही. मात्र असे असताना त्यादिवशी दिल्लीहून विमानतळाला जाताना त्यांनी वेळ कशी पाळली याचे मात्र कोडेच आहे, असे पवारांनी या कार्यक्रमात म्हटले होते. -
सभागृहात ग्रामीण लहेजाने सत्ताधाऱ्यांच्या टोप्या उडवण्यात गोपीनाथ मुंडे तरबेज होते. त्यांना ही शैली इतकी अवगत होती की प्रसंगी विरोधकही त्याचा आनंद घेत असत. हाताला जे लागतील ते कागद फडकावत मुंडे असे काही घणाघाती हल्ले करीत की पाहणाऱ्यास त्यांच्या हातातील कागदांवर सर्व तपशील लिहिलेला आहे की काय, असे वाटावे. हातातील कागदावरील मजकूर जणू आपण वाचत आहोत, असा आभास तर त्यांनी अनेकदा निर्माण केला. मात्र, प्रत्यक्षात त्या कागदांवर कोणताही मजकूर लिहलेला नसे. हे कागद चक्क कोरे करकरीत असत.
-
राजकारण आणि समाजकारणाचा मुंडेंचा अभ्यास थक्क करणारा होता. चर्चेत मुंडे यांना थोपवू गेल्यास राव.. आईकाना.. असे म्हणत ते नव्या उत्साहाने आपली बाजू मांडत. कधी त्यांना फोन जरी केला तरी आईकाना.. तुम्ही काय सांगता.. असे म्हणत मुंडे सुरुवात करीत.
खासदार उदयनराजे भोसले यांची आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत होती. उदयनराजे कोणत्याही पक्षात असले तरी मुंडेंच्या मनात त्यांच्याविषयी उत्कट प्रेम होते. उदयनराजेंना राष्ट्रीय प्रवाहात आणून त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद असो, की, महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांचा युतीच्या मंत्रिमंडळातील समावेश असो, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा वाटा सिंहाचा होता. सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजेंचा शब्द गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच अंतिम मानला होता. त्याचा अनुभव अनेक प्रसंगातून आला होता. सदरबझार येथे सातारा नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरसाठी केंद्र शासनाने दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र नगरपालिकेने दिले नव्हते. त्यामुळे केंद्र शासनाकडून १९८७ पासून २००२ पर्यंत एक रुपयाचाही निधी सातारा नगरपालिकेला मिळत नव्हता. केंद्र शासनाच्या छोट्या शहरांसाठी असलेल्या अनेक योजनांचा फायदा सातारकरांना मिळत नव्हता. नगरपालिकेत २००१ मध्ये सातारा विकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी तत्कालीन उपनगराध्यक्ष आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर माळवदे यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा फायदा सातारा पालिकेला मिळावा यासाठी मुंडे यांच्याबरोबर चर्चा केली होती. मुंडे हे माळवदे यांना घेऊन दिल्लीला गेले. त्यावेळी केंद्रीय नगरविकासमंत्री अनंतकुमार यांच्याशी मुंडेंसमवेत माळवदे यांनी चर्चा केली. साताऱ्यासाठी एकात्मिक शहर विकास योजनेतून ६५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. त्यामुळे नगरवाचनालयासमोर आणि मोती तळ्याशेजारी व्यापारी संकुले उभी राहिली. कालिदास पेट्रोल पंप ते जरंडेश्वर नाका हा रस्ता, ही मुंडे यांचीच सातारकरांसाठी देणगी आहे. कोणत्याही पक्षाचे अन्य नेते कितीही बोलून गेले तरी मुंडे बोलायला उभे राहिले की बघता बघता चित्र पालटत असे. स्वत:वर त्यांचे प्रेम होते. त्यामुळे उत्तम भाषण झाले की खाली बसता बसता ते खिशातून हळूच कंगवा काढत, केसावर फिरवत उलटी मान करून वार्ताहर कक्षाकडे नजर टाकत भाषणाचा योग्य तो परिणाम झाला की नाही याची दखल घेत. पक्षाच्या बैठकीत बसल्यानंतर गोपीनाथ मुंडे प्रत्येकाचे बोलणे लक्ष देऊन ऐकत असत. एखाद्याचे बोलणे सुरू असताना खाली बघत असताना मध्येच वरती पाहायचे आणि आपला मुद्दा मांडायचा ही मुंडेंची खास शैली आजही भाजप नेत्यांच्या लक्षात आहे. -
२००९च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यामध्ये आपलीच सत्ता येणार याची पूर्ण खात्री होती. मात्र, जनतेने अनाकलनीयपणे काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आणि भाजपच्या स्वप्नांचा चुराडा झाला. निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयात उपस्थित असणारे कार्यकर्ते प्रचंड निराश झाले होते. त्यामुळे कार्यालयात एकुणच सुतकी वातावरण होते. अशावेळी मुंडेंची प्रतिक्रीया काय असेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, गोपीनाथ मुंडे कार्यालयात आले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही दु:खाची भावना नव्हती. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना असे खचून जाऊ नका असे सांगितले. आपण पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरूवात करू. त्यामुळे आता रडायचं नाही, लढायचं, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
-
२००९मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकदा गोपीनाथ मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. खराब हवामानामुळे त्या वेळी वैमानिकाने मुंडे यांचा जीव वाचवण्यासाठी गवताळ कुरणावर इमर्जन्सी लँडिंग केले होते. त्यावेळी मुंडे यांनी एका पोलिस शिपायाच्या दुचाकीवरून पोलिस ठाणे गाठले होते. त्या वेळी ठाणेदाराने बसण्यासाठी दिलेली स्वत:ची खुर्ची त्यांनी नाकारली होती.
गोपीनाथ मुंडे यांच्या एकसष्ठीनिमित्त १२ डिसेंबर २०१० रोजी मुंबईत त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आभारप्रदर्शक भाषणादरम्यान बोलताना एकच धमाल उडवून दिली होती. यावेळी त्यांनी आज मी पहिल्यांदा एखाद्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचल्याचे स्वत:हून कबुल केले. अनेकांनी मी आलो आहे की नाही याची खात्री करून सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे आता तरी वर्तमानपत्रे मुंडे वेळेवर येतात अशी बातमी छापतील, अशी आशा करत असल्याची मिश्कील प्रतिक्रियाम मुंडेंनी दिली होती. -
आमच्यात विधिमंडळात काम करताना अनेकदा टोकाचे मतभेद झाल्याची आठवणही मुंडेंनी यावेळी सांगितली. छगन भुजबळ यांनी एकदा तर मला भर विधानसभेत बांगड्या भरण्याचा सल्ला दिली होता. त्यांनी त्यावेळी इतकी टोकाची भूमिका घेऊनही आमच्या मैत्रीत कधीही वितुष्ट न आल्याचे त्यांनी सांगितले.
-
मी एकसष्ठीचा झालो, असे मला अजूनही वाटत नाही. परंतु विलासरावांसारखे मी वय लपवत नाही… विलासरावांची एकसष्ठी झालेली नाही, परंतु ते माझ्यापेक्षा वडील आहेत, हे सांगायला मी अजिबात विसरणार नाही…’ अशी फिरकी गोपीनाथ मुंडे यांनी सत्काराला उत्तर देताना घेतली. ‘भुजबळसाहेब, तुम्ही हसू नका. तुम्हीही माझ्यापेक्षा वडील आहात आणि कंपॅरेटिव्हली मी तुम्हा दोघांपेक्षा तरुण आहे,’ असे ते मिश्किलपणे म्हणाले होते.
-
प्रमोद महाजन यांचे जाणे हे मुंडे यांना मोडून पाडणारे होते. महाजन काही केवळ त्यांचे सहकारीच नव्हते. तर वैयक्तिक आयुष्यातील सुहृददेखील होते. त्यामुळे महाजनांच्या निधनानंतर कित्येक दिवस मुंडे शोकमग्न होते आणि अश्रूंना मोकळी वाट करून देण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. सख्ख्या भावाच्या हल्ल्यात विदग्ध झालेल्या महाजनांना मांडीवर घेत रुग्णालयात दाखल केले ते मुंडेंनीच. त्यानंतर दिवसरात्र ते महाजनांच्या उशाशी बसून होते. प्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर आठ वर्षांनंतर मे महिन्यातच गोपीनाथ मुंडे यांचे निधन होणे एकप्रकारचा दुर्दैवी करुण योगायोग म्हणायला हवा.
-
मुंबईत वस्त्रहरण नाटकाच्या ५०००व्या प्रयोगाच्यावेळीही गोपीनाथ मुंडेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मार्मिक टोलेबाजी केली होती. राज यांनी आपल्या भाषणात सध्या संपूर्ण महाराष्ट्राची जबाबादारी माझ्यावर येऊन पडल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्राचे काम करण्याची जबाबदारी उचलल्यामुळे आता दिल्लीत विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना चिंता करायची गरज नसल्याचे सांगत मुंडेंनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला होता.
गतवर्षीच्या निवडणुकांदरम्यानचा आणखी एक प्रसंगही कार्यकर्त्यांचा चांगलाच लक्षात राहिला. २० एप्रिल २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे विमानाने जळगावला आले होते. त्यावेळी सभा आटपून हॉटेलमधून विमानतळाकडे परतत असताना गोपीनाथ मुंडे यांना सोडण्यास भाजपाचा कुणीही कार्यकर्ता न आल्याने नाराज झालेल्या मुंडे यांनी रिक्षा करुन विमानतळ गाठण्याचा प्रयत्न केला. मुंडे रिक्षाने रवाना झाल्याचे कळताच भाजपात प्रचंड खळबळ उडाली आणि त्यांची सातत्याने माफी मागितल्यावर अखेर ते मोटारीने पुढे विमानतळाकडे रवाना झाले. विमानतळाकडे जात असताना सर्व कार्यकर्ते एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर त्यानंतरच्या रविवारी होत असलेल्या नरेंद्र मोदींच्या सभेची चर्चा, तयारीत गुंतले होते. मात्र, मुंडे रिक्षाने विमानतळाकडे रवाना झाल्याची बातमी खडसेंच्या बंगल्यावर धडकताच प्रचंड खळबळ उडाली आणि माजी आमदार गुरूमुख जगवानी आपल्या कारने मुंडेंची रिक्षा गाठली व झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तरी मुंडेंचा राग शांत झालेला नव्हता. मध्यभागी रिक्षा आणि मागेपुढे पोलीस अशी ही संतप्त नेत्याची आस्त कदम मिरवणुक पुढे जातच राहिली. अखेर अजिंठा चौफुली जवळ परत जगवानींनी माफी मागत गोपीनाथ मुंडे यांना कारमध्ये बसण्याची विनंती केली. तो पर्यंत मुंडे शांत झालेले होते. यानंतर रिक्षातून उतरून ते कारने विमानतळाकडे रवाना झाले. पदभार स्विकारताना मुख्यमंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (लोकसत्ता छायाचित्र) गोपीनाथ मुंडे आपल्या पत्नीसह. (लोकसत्ता छायाचित्र) सुषमा स्वराज आणि गोपीनाथ मुंडे चर्चा करताना. (लोकसत्ता छायाचित्र) -
गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, राज ठाकरे आणि प्रमोद महाजन संवाद साधताना (लोकसत्ता छायाचित्र)
गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी युतीचे अभेद्य खांब (लोकसत्ता छायाचित्र)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…