-
हिरॉइनची बहीण ही तशी दुय्यमच भूमिका. पण ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात आभाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून ही भूमिका साकारणाऱ्या नेहा महाजनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सिनेमात नायक-नायिकांवरच जास्त भर दिला जात असला तरी सिनेमातल्या काही साहाय्यक व्यक्तिरेखाही लक्ष वेधून घेतात. तसंच झालं आभा या व्यक्तिरेखेचं. प्रेक्षकवर्गाने आभा असलेल्या प्रत्येक प्रसंगाला दाद दिली.
-
‘कॉफी आणि बरंच काही.’ सिनेमात बहिणीची भूमिका साकारलेल्या नेहा महाजनची भूमिका संपूर्ण सिनेमात लक्षात राहते. नेहाने साकारलेली आभा कमी वेळात मनात घर करून जाते. खरं तर या भूमिकेची लांबी फारशी नाही. तरी आभा प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवते. सिनेमातल्या चेहऱ्यांपैकी नेहा महाजन हिचा चेहरा तसा प्रेक्षकांसाठी नवखा आहे. त्यामुळे या अभिनेत्रीविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.
-
एएफएस म्हणजे अमेरिकन फिड सव्र्हिस ही संस्था अमेरिकेतल्या लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी काम करते. या संस्थेकडून विद्यार्थी सांस्कृतिक देवाणघेवाणी अंतर्गत ती अमेरिकेत गेली. मूळची तळेगावची असलेली नेहा अकरावीच्या मध्यावर अमेरिकेत गेली. त्यामुळे अकरावीचं र्अध वर्ष आणि बारावी ती अमेरिकेत शिकली आहे.
-
तिचे बाबा सतारवादक असल्यामुळे लहानपणापासूनच ती कला क्षेत्राकडे खेचली गेली. पुढे फर्ग्युसन कॉलेजमधून तिने बीए आणि पुणे विद्यापीठातून फिलॉसॉफी विषयात एमए केलं. लहानपणापासूनच नेहाला अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं.
-
बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या सिनेमात. एमए करताना तिला दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या सिनेमात काम करायची संधी मिळाली. ‘बेवक्त बारीश’, ‘मिडनाइट चिल्ड्रन’ अशा वेगळ्या धाटणीचे सिनेमे करूनही नेहाला ‘कॉफी..’ या सिनेमाने खुणावलं. ‘आजोबा’, ‘संहिता’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केल्या आहेत.
-
नेहामध्ये एक संगीतप्रेमीही दडलेली आहे. गेली नऊ वर्ष ती तिच्या बाबांकडे म्हणजे पंडित विदुर महाजन यांच्याकडे सतारवादनाचं शिक्षण घेतेय. गाण्याची आवड असल्यामुळे पार्श्वगायनाची संधी मिळाली तर तिचा नक्की विचार करणार असल्याच ती म्हणते. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे. तिची आवड तिने सिनेमांमध्येही जपली आहे. मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय.
-
अभिनय आणि संगीत याव्यतिरिक्त नेहाला स्विमिंग, वाचन, खेळ यात रस आहे. ‘सिद्धांत’ आणि ‘नीळकंठ मास्तर’ हे मराठी, तर ‘फिस्ट ऑफ वाराणसी’ हा ब्रिटिश असे तिचे आगामी सिनेमे आहेत. ‘कॉफी..’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एका सुंदर, साध्या आणि हुशार अभिनेत्रीची ओळख झाली. नेहाच्या चोख कामामुळे तिचा विशिष्ट चाहता वर्ग तयार झाला आहे. तो वाढायला फारसा वेळा लागणार नाही.

Sanjay Raut : संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, त्याला…”