-
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी 'लोकसत्ता.कॉम'शी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
"एकेकाळी रेल्वेत भीक मागून आणि स्मशानात झोपून मी दिवस काढले. पण तशी वेळ इतर महिलांवर येऊ नये यासाठी मी निर्धार केला आणि अनाथांची माय झाले", अशा शब्दात त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
-
"मी माझं जीवन जगत गेले. चालत राहिले. फक्त त्यावेळी मी मागे वळून पाहिलं एवढंच… एकेकाळी नातलगांनी आणि मित्रपरिवाराने खांदा काढून घेतला होता. पण आज अख्खं जग मला खांद्याने आधार देत आहे", असं त्या म्हणाल्या.
-
"मला आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला याचाच अर्थ माझे खांदे अधिक मजबूत व्हावेत याचीच सरकारने काळजी घेतली आहे. हा पुरस्कार मला मिळेल याची मला कधी अपेक्षा किंवा कल्पनाच नव्हती", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
-
"मी अशी आहे तरी कोण? मी आपली हाफ टाईम मराठी चौथी पास…. नऊवारी जिंदाबाद… घेणं देणं नाही अशी अडाणी बाई… पद्मश्रीपर्यंत कशी जाऊ शकेल? माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे एका अर्थी धक्काच आहे", इतक्या साध्या सरळ आणि सोप्या शब्दात त्यांनी पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली. तसेच, जीवन प्रवासात समाजातील ज्या साऱ्यांनी सढळहस्ते मदत केली, त्यांना त्यांनी पुरस्कार अर्पण केला.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती