-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१९ वर्ष गाजवताना अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये बाजी मारली.
-
विराटनेही या वर्षात धडाकेबाज खेळी करत अनेक विक्रम मोडले, जाणून घेऊयात वर्षभरात विराटने केलेल्या विक्रमांची यादी…
-
२०१९ विश्वचषक स्पर्धेत सलग पाच डावांमध्ये अर्धशतकी खेळी केली. विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा विराट पहिला कर्णधार ठरला.
-
मात्र स्टिव्ह स्मिथनंतर खेळाडू या नात्याने अशी कामगिरी करणारा तो विश्वचषकातला दुसरा खेळाडू ठरला आहे.
-
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. ३ जानेवारी रोजी सिडनी कसोटी अनिर्णित अवस्थेत सुटल्यानंतर भारताने आपल्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.
-
वेस्ट इंडिजमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये चार शतकं झळकावणारा विराट पहिला पाहुणा कर्णधार ठरला. यादरम्यान त्याने कॅरेबियन बेटांवर वन-डे क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रीकही केली.
-
ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर विराटने पाचवं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या या प्रसिद्ध मैदानावर पाच शतकं झळकावणारा विराट दुसरा पाहुणा फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या सर जॅक हॉब्स यांनी अशी कामगिरी केली होती.
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची वन-डे सामन्यात विराटने झळकावलेलं शतक हे त्याचं धावसंख्येचा पाठलाग करतानाचं सहावं शतक होतं. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध याआधी वन-डे क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावली होती.
-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलेलं द्विशतक हे विराटचं कसोटी क्रिकेटमधलं सातवं द्विशतक ठरलं. आफ्रिकेविरुद्ध विराटचं कसोटी क्रिकेटमधलं पहिलंच द्विशतक ठरलं. यादरम्यान विराटने सचिन आणि सेहवागचा ६ द्विशतकांचा विक्रमही मोडला.
-
पोर्ट-ऑफ स्पेन वन-डे सामन्यात झळकावलेलं शतक हे विराटचं वेस्ट इंडिजविरुद्धचं ९ वं शतक ठरलं. यादरम्यान विराटने सचिनशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये ९ शतकं झळकावली आहेत.
-
कोलकाता कसोटी सामन्यात झळकावलेलं शतक हे विराटचं दहावं शतक ठरलं. विराटने यादरम्यान सुनिल गावसकर यांचा घरच्या मैदानावर कर्णधार या नात्याने ९ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.
-
कोलकाता कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ४१ शतकं जमा झाली आहेत. विराटने यादरम्यान रिकी पाँटींगच्या ४१ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
-
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली आता भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. विराटने आतापर्यंत ३३ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने धोनीचा २७ विजयांचा विक्रम मोडला.
-
दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट भारताचा पहिला खेळाडू आणि कर्णधार ठरलाय. कोलकाता कसोटी सामन्यात विराटने १३६ धावांची खेळी केली.
-
आपल्या आतापर्यंतच्या वन-डे कारकिर्दीत विराटने पहिल्यांदाच ६० पेक्षा अधिक सरासरी नोंदवली. मार्च महिन्यात रांची वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली.
-
ऑस्ट्रेलियात वन-डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला. अॅडलेड ओव्हलच्या मैदानातील वन-डे सामन्यात विराटने १०४ धावांची खेळी केली. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने कर्णधार या नात्याने ऑस्ट्रेलियात ९३ धावा केल्या होत्या, विराटने हा विक्रम आपल्या नावे केला.
-
कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद २५० पेक्षा जास्त धावा करणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
-
विश्वचषकादरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सर्वात जलद करण्याचा विक्रम विराटच्या नावे जमा झाला आहे.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”