Hockey Queen Rani Rampal: हरियाणामधील शाहबाद येथून बाहेर पडल्यानंतर 'वर्ल्ड गेम अॅथलिट ऑफ द इअर' आणि पद्मश्री जिंकण्यापर्यंतचा राणी रामपालचा प्रवास एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला साजेसा आहे. (All Photos: Rani Rampal Instagram) समाज आणि गरिबीशी लढा देत संघर्षावर मात करत यश मिळवणारी राणी रामपाल आज अनेक तरुणींचा आदर्श आहे. यश मिळवण्यासाठी राणी रामपालला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. राणी रामपालला नुकतंच World Game Athelet of the Year साठी निवडण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय आणि जगातील एकमेव हॉकी खेळाडू आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून हॉकी खेळणारी राणी रामपाल सांगते की, "हा प्रवास चांगला आणि संघर्षमय होता. हा पुरस्कार एका वर्षाची मेहनत नसून त्यामागे १८ ते १९ वर्षांचं कष्ट आहे. मी कर्मावर विश्वास ठेवते. फक्त नशिबाने हा पुरस्कार मिळालेला नाही". -
‘‘राणीला वर्ल्ड गेम्सचा सर्वोत्तम अॅथलीटचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. राणीने तब्बल १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले. जगभरातील ७ लाख, ५ हजार, ६१० चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना मते दिली होती,’’ असे ‘वर्ल्ड गेम्स’च्या पत्रकात म्हटले आहे.
‘‘संपूर्ण हॉकीक्षेत्राला, भारताला तसेच माझ्या संघसहकाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते. चाहते, प्रशिक्षक, भारत सरकार यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवू शकले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याने त्यांचेही खूप खूप आभार,’’ असे राणीने सांगितले. -
एक वेळ अशी होती जेव्हा राणी रामपालच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. तिच्याकडे हॉकी किट खरेदी करण्यासाठी तसंच कोचिंगसाठीही पैसे नव्हते. इतकंच नाही तर तिच्या खेळण्याला विरोधही करण्यात आला होता. पण आज त्याच विरोध करणाऱ्यांसाठी ती रोल मॉडेल आहे. हे स्वप्न साकार करण्यात तिच्या आई वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे.
-
राणी रामपाल सांगते की, "आजपासून २० वर्षांपूर्वी हरियाणासारख्या राज्यात मुलींना इतकं स्वातंत्र्य नव्हतं. पण आता परिस्थिती एकदम बदलली आहे. माझ्याकडे पाहून अनेकांनी आपल्या मुलींना खेळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं पाहून चांगलं वाटतं. जिथे एकेकाळी मुलीचा जन्म होणे पाप समजलं जायचं तिथेत बदल होताना पाहून आणि आपण त्याचा भाग आहोत ही जाणीव खूप दिलासा देणारी आहे". आपल्या पुरस्कारांबद्दल बोलताना राणी रामपाल सांगते की, "तुमच्या प्रयत्नांचं कौतुक झालेलं पाहून चांगलं वाटतं. यामुळे देशासाठी अजून चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळते. अशा पुरस्कारांमुळे महिला हॉकीला वेगळी ओळख मिळते जी खास आहे. मी नेहमीच संघासाठी १०० टक्के देत असते, आणि यापुढेही देत राहीन". माझ्या कुटुंबाने खूप संघर्ष केला आहे. आमच्याकडे घड्याळ घेण्यासाठीही पैसे नव्हते. मी प्रॅक्टिस सेशनसाठी वेळेत पोहोचावी यासाठी माझी आई मला सकाळी लवकर उठवायची असं राणी सांगते. राणीने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, हॉकी खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. तिच्या वडिलांनी गावातील एका अकॅडमीत तिला प्रवेश दिला होता. तिच्या प्रशिक्षकाने तिला पाठिंबा दिला आणि हातात हॉकी स्टिक सोपवली. वयाच्या १४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारी राणी रामपाल सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. -
जेव्हा राणी १५ वर्षांची होती तेव्हा २०१० मधील विश्व महिला कपमध्ये सर्वात कमी वयाची खेळाडू होती. राणी सांगते की, आपण जिथे वाढलो तिथे मुलींना बंद दरवाजाआड घरात ठेवलं जायचं. जेव्हा आपण हॉकी खेळण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नातवेईकांनी टोपणे मारत आता छोटे स्कर्ट घालून मैदानात धावून कुटुंबाचं नाव छोटं करणार का ? असं म्हटलं होतं. राणी रामपालचे वडील घोडागाडी चालवत असतं. तसंच वीट विकण्याचे काम करत. त्यांनी कमावलेल्या पैशात कुटुंबाचं पोट भरत नसे. जेव्हा जोराचा पाऊस यायचा तेव्हा घऱात पाणी भरायचं. आपण आपल्या दोन्ही भावांसोबत मिळून पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना करायचो अशी आठवण राणी सांगते. राणीचं बालपण इतर मुलांप्रमाणे नव्हतं. कॉलेज, मित्र यांच्याजागी तिच्यासोबत नेहमी हॉकी स्टीक असायची. आपल्या दोन्ही भावांच्या लग्नातही ती सहभागी होऊ शकली नव्हती. -
"मी सात वर्षांची असल्यापासून हॉकी खेळत आहे. कोच बलदेव सिंह फार शिस्तबद्ध होते. पूर्ण वर्षभरात कधीही सुट्टी मिळायची नाही. मी लहानपणापासून आपले नातेवाईक पाहिलेले नाहीत आणि आजही जास्त वेळ घराबाहेरच असते. घऱी कोणी पाहुणे आले की आई नेहमी ओळख करुन देत असते," असं राणीसांगते. "मी आपल्या दोन्ही भावांच्या लग्नात हजर राहू शकली नव्हती. मी यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचं बलिदान दिलं आहे. पण मला याबद्दल काही खेद नाही," असं राणी म्हणते. -
वयाच्या या टप्प्यावर लग्नासाठी दबाव असताना राणी मात्र आपली नदर टोकियो ऑलिम्पिकवर असल्याचं सांगते. -
२५ वर्षीय राणी रामपाल सांगते की, "माझ्यावर लग्नाचा दबाव नाही तर ऑलिम्पिकचा दबाव आहे. मेडल जिंकणं माझं मुख्य लक्ष्य आहे. इतर कसलाच विचार मी करत नाही. भारतीय संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकून द्यायचं आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्याची वाट पाहत आहोत, आमचा संघ यश मिळवेल याची पूर्ण खात्री आहे".
आम्ही टॉप रॅकिंग संघाविरोधात चांगली खेळी केली आहे. भारतीय संघात योग्य समतोल राखला आहे त्यामुळे यश मिळेल असा रानी रामपालला विश्वास आहे. भारतीय हॉकी संघाची कर्णधार असणाऱ्या राणी रामपालचं स्वप्न आहे की, जर तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट झाल्यास त्यामध्ये दीपिकाने तिची भूमिका करावी. माझ्या आय़ुष्यावर जर बायोपिक तयार झाला तर त्यात दीपिकाने माझी भूमिका करावी. कारण तिचं खेळावर प्रेम आहे. तिला तिच्या कुटुंबाकडून ते मिळालं आहे. मला दीपिकामध्ये एका खेळाडूचे गुण दिसतात असं राणीरामपाल सांगते.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”