-
करोना विषाणूचा फटका आयपीएललाही बसला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलची स्पर्धा बीसीसीआयने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
-
मात्र देशात सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होईल ही शक्यता कमीच दिसते आहे. बीसीसीआयमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यंदाच्या हंगामाची स्पर्धा रद्द होण्याची शक्यताही बोलून दाखवली.
-
याव्यतिरीक्त बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाचं आयोजन पुढे ढकलून आयपीएल खेळवता येईल का ही शक्यताही तपासून पाहत आहे.
-
भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राच्या मते यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर भारताच्या ५ खेळाडूंना याचा मोठा फटका बसू शकतो. पाहूयात कोण आहेत हे खेळाडू…
-
५) सुरेश रैना – सुरेश रैना गेल्या काही महिन्यांमध्ये घरच्या मैदानावर फारसं टी-२० क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच भारतीय संघातली जागाही तो गमावून बसला आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास त्याला भारतीय संघात पुनरागमन करणं अशक्य होईल.
-
४) कृणास पांड्या – अष्टपैलू रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही फिरकी जोडगोळी यामुळे कृणालला गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघात आपलं स्थान कायम राखता आलेलं नाही. विश्वचषक संघात आपली दावेदारी सांगण्यासाठी कृणालला आयपीएल हे एक चांगलं व्यासपीठ होतं. मात्र यंदाचा हंगाम रद्द झाल्यास त्याच्यासाठी स्पर्धा अधिक कठीण होईल.
-
३) संजू सॅमसन – यष्टीरक्षक फलंदाज संजूला भारतीय संघात फार कमी संधी मिळाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये संजू मिळालेल्या संधीचं सोनं करु शकला नाही. त्यामुळे आकाश चोप्राच्या मते संजूसाठी आयपीएल ही आपली दावेदारी सांगण्याची एक हक्काची स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा रद्द झाल्यास संजूला आणखी काही काळ थांबावं लागू शकतं.
-
२) शिवम दुबे – शिवम दुबेला न्यूझीलंड दौऱ्यात संधी देण्यात आली होती, मात्र तो आपला स्थानिक क्रिकेटमधला फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवू शकला नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्या आता दुखापतीमधून सावरला आहे…त्यामुळे शिवम दुबेला भारतीय संघात स्थान मिळवणं कठीण जाईल. आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी आयपीएल हे एक उत्तम माध्यम शिवमकडे आहे, पण ही स्पर्धा रद्द झाल्यास शिवमसाठी सर्व कठीण होऊन बसेल.
-
१) ऋषभ पंत – न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतला विश्रांती देत लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी आयपीएल हे उत्तम व्यासपीठ पंतसाठी तयार होतं. पण यंदाची स्पर्धा न झाल्यास निवड समिती पुन्हा एकदा पंतला डावलून राहुलकडे यष्टीरक्षण सोपवू शकते.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी