-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीमधून सर्वात आधी बाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला शेवटच्या काही सामन्यांमध्ये आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट चेन्नईच्या हाती लागली ती म्हणजे ऋतुराज गायकवाड. याच ऋतुराजने नुकताच एक महत्वाचा करार केला आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन)
-
ऋतुराजने क्रिडा विपणन आणि कौशल्य व्यवस्थापन म्हणजेच स्पोर्ट्स मॅनेजमेंट अॅण्ड स्किल डेव्हलपमेंटसंदर्भात काम करणाऱ्या बेसलाइन व्हेंचर्ससोबत करार केला आहे. काही वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेल्या या करारानुसार ही कंपनी आता ऋतुराजच्या व्यवसायिक कारभार हाताळणार आहे.
-
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीने अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन संघातील तरुणांना संधी दिली. संघाने आणि कर्णधाराने दिलेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावत आपल्यातली गुणवत्ता सिद्ध केली.
-
ऋतुराज गायकवाडने साखळी फेरीत आपला अखेरचा सामना खेळताना पंजाबविरुद्ध सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळे ऋतुराज चेन्नईकडून सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. RCB, KKR आणि पंजाब अशा तीन संघांविरोधात ऋतुराजने अर्धशतक झळकावत स्वतःच्या खेळाचा दर्जा दाखवून दिला.
-
RCB, KKR आणि पंजाबविरुद्ध सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. धोनीनेही त्याच्या खेळाचं कौतुक केलं.
-
२३ वर्षीय ऋतुराज गायकवाड हा मुळचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगावचा रहिवासी. स्थानिक क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतो. २०१६ साली वयाच्या १९ व्या वर्षी ऋतुराजने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं होतं.
-
स्थानिक क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजला देवधर करंडक, भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. २०१९ सालात ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
-
भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध खेळताना ८ डावांत ११२.८३ च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. याव्यतिरीक्त २०२० वर्षाच्या सुरुवातीस न्यूझीलंड दौऱ्यात भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजने ३ वन-डे सामन्यांत १५४ धावा केल्या होत्या.
-
ऋतुराजच्या याच कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाने त्याला संघात घेतलं. २०१९ चा संपूर्ण हंगामात ऋतुराजला एकही सामना खेळायला मिळाला नाही. ऋतुराजला २०१९ मध्ये आयपीएल लिलावामध्ये चेन्नईने २० लाखांना विकत घेतलं.
-
यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्येही ऋतुराजला संधी मिळाली, परंतु फलंदाजीची जागा निश्चीत नसल्यामुळे ऋतुराज अपयशी ठरला. परंतू सरतेशेवटी आपल्या नैसर्गिक शैलीप्रमाणे संघाकडून सलामीला येताना ऋतुराजने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. ऋतुराजने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या.
-
वयाच्या ११ व्या वर्षापासून ऋतुराजने पुण्यात वेंगसरकर अदाकमीत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. तेराव्या हंगामाआधी चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली त्यावेळी ऋतुराज गायकवाडला संघात तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार अशी चर्चा होती. परंतु युएईत करोनाची लागण झाल्यानंतर ऋतुराज सुरुवातीच्या सामन्यांना मुकला.
-
ऋतुराजने जारी केलेल्या पत्रकामध्ये त्याने, "बेसलाइन आपल्या देशातील काही चांगल्या खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळेच मी या कंपनीशी करार केला असून याबद्दल मी खूप उत्सुक आहे. ही देशातील सर्वोत्तम स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने अनेक तरुण खेळाडूंना योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत केली असून अनेकांच्या करियरला योग्य आकार दिला आहे," असं म्हटलं आहे.
-
बेसलाइन व्हेंचर्स ही कंपनी पी.व्ही. सिंधू, स्मृती मंधाना, दीपिका कुमारी, भुवनेश्वर कुमार, पंकज अडवणी, सौरब घोषाल, संजू सॅमसन, आणि अमित पंघाल सारख्या अनेक आघाडीच्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं काम करते. याच खेळाडूंच्या यादीत आता ऋतुराजचाही समावेश झाला आहे.
-
चांगल्या कामगिरीनंतर ऋतुराजला जाहिरात कंपन्यांबरोबरच अन्य ऑफर्स येण्याची शक्यात असल्याने त्याने व्यवसायिक कारभारासंदर्भातील कामांसाठी आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी कंपनीबरोबर करार केल्याचे सांगितले जात आहे. सामान्यपणे या कंपन्या खेळाडूंना कोणत्या ब्रॅण्डबरोबर जाहिराती कराव्यात, किती पैसे आकारण्यात यावेत यासंदर्भातील मार्गदर्शन करतात, त्याचबरोबरच खेळाडूंच्यावतीने कंपन्यांशी चर्चा करणे, करार करणे अशा अनेक गोष्टींची काळजी या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्या घेतात. सामान्यपणे अनेक मोठे खेळाडू अशाप्रकारच्या कंपन्यांबरोबर करार करुन आपले व्यवसायिक हितसंबंध अधिक चांगल्याप्रकारे हातळण्याला प्राधान्य देतात.
-
कंपनीने ऋतुराजबरोबर करार केल्याचा आम्हाला विशेष आनंद असून भविष्यात त्याच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही अधिक उत्सुक आहोत असं पत्रकामध्ये म्हटलं आहे.

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार