भारत विरुद्ध इंग्लडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अगदी शेवटची काही षटकं शिल्लक असताना भारताने विजय मिळवला. (सर्व फोटो : ट्विटर, आयसीसी, बीसीसीआयवरुन साभार) -
अगदी अटीतटीचा म्हणावा तसा हा सामना झाला. शेवटची काही षटकं शिल्लक असतानाच भारताने विजय मिळवला तरी कर्णधार विराट कोहलीकडून सुटलेले झेल चांगलेच चर्चेत राहिले.
-
त्यातच विराटने आपल्या संघ सहकाऱ्यांना दिलेला एक सल्ला सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्याने कोणीही हसायचं नाही असं म्हटल्याचं दिसून आलं आहे.
-
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली. आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडपुढे विजयासाठी ६० षटकांत २७२ धावांचे आव्हान ठेवले.
-
मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
-
शमीने कारकीर्दीतील झुंजार अर्धशतकी खेळी साकारताना जसप्रित बुमराच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात ८ बाद २९८ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेले.
-
उपाहारानंतर दुसऱ्याच षटकात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. मग गोलंदाजांनी ५१.५ षटकांत भारताचा लॉर्ड्सवर विजयाध्याय लिहिला.
-
६० षटकांचा सामना शिल्लक असतानाच भारताचा संघ मैदानामध्ये गोलंदाजीसाठी उतरला. सामन्याचे तिन्ही निकाल यावेळी शक्य होते.
-
मात्र क्षेत्ररक्षणसाठी संघ मैदानात उतरताना विराटने ६० षटकांचा खेळ बाकी असल्याने आपल्या सहकाऱ्यांना तंबीच दिली.
-
भारत विजयाच्या अपेक्षेनेच अंतिम दिवसाचे काही तास शिल्लक असताना मैदानात उतरला होता. त्यामुळेच विराटने सामना जिंकून १-० ची आघाडी मालिकेत मिळवायची असल्याचं आपल्या सहकाऱ्यांना खेळ सुरु होण्यापूर्वी हर्डल करुन नियोजन करताना सांगितलं.
-
त्याचेवेळी त्याने,"मला कोणी हसताना दिसलं तर बघा. या ६० षटकांमध्ये तुम्ही जीव तोडून खेळ करणं अपेक्षित आहे," असं विराटने आपल्या सहकऱ्यांना कर्णधार या नात्याने इशारा वजा सूचनाच केली.
-
विराटच्या सुचनेनुसार भारतीय संघ मैदानात उतरला आणि त्यांनी इंग्लंडची दाणादाण उडवून दिली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्याच षटकात इंग्लंडची २ बाद १ अशी केविलवाणी अवस्था केली.
-
रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ली या सलामीवीरांना अनुक्रमे बुमरा आणि शमी यांनी भोपळाही फोडू दिला नाही. मग हसीब हमीद (९) आणि रूट यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४३ धावांची भागीदारी केली. इशांतनेच हमीद आणि जॉनी बेअरस्टो (२) यांना पायचीत करून इंग्लंडच्या आव्हानातील हवाच काढून घेतली.
-
बुमराने चिवट फलंदाज रूटला ३३ धावांवर दुसऱ्या स्लीपमध्ये कोहलीकरवी झेलबाद करून इंग्लंडला आणखी एक हादरा दिला.
-
६७ धावांवर निम्मा संघ गारद झाल्यानंतर जोस बटलर (१५) आणि मोईन अली (१३) यांनी १५.४ षटकांत २३ धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले.
-
सिराजने मोईनला बाद करून ही जोडी फोडली. मग पुढच्याच चेंडूवर त्याने सॅम करनला शून्यावर बाद केले. करन सलग दुसऱ्या डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.
-
इशान शर्मानेही भन्नाट गोलंदाजी करत शमी आणि बुमराहला उत्तम साथ दिली.
-
बटलरने ऑली रॉबिन्सनच्या (९) साथीने १२.३ षटकांत ३० धावांची भागीदारी करून सामना अनिर्णीत राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण बुमराने पायचीत करून भारताच्या आशा जिवंत राखल्या.
-
पुढच्याच षटकात सिराजने ९६ चेंडूंत २५ धावा काढून मैदानावर टिकाव धरणाऱ्या बटलरचा अडसर दूर केला अणि तीन चेंडूच्या अंतराने जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवून इंग्लंडच्या दुसऱ्या डावापुढे पूर्णविराम दिला.
-
त्याआधी, भारताने ६ बाद १८१ धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केला; परंतु ऋषभ पंत (२२) लवकर बाद झाल्यामुळे यजमानांच्या विजयाच्या आशा उंचावल्या; परंतु तळाच्या फलंदाजांनी ९८ धावांचे योगदान दिले.
-
इशांत शर्मा १६ धावांची भर घालत माघारी परतल्यानंतर शमीने भारताच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ११६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ धावा करतानाच बुमराच्या (नाबाद ३४) साथीने नवव्या गडय़ासाठी ८९ धावांची नाबाद भागीदारी केली. शमीने मोईन अलीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत कारकीर्दीतील दुसरे कसोटी अर्धशतक साकारले. शमीच्या खेळीने सामन्याचे समीकरणच बदलून टाकले.
-
भारताचा नववा आणि १०व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर असल्याने सुरुवातीला इंग्लंडचा कर्णधार जो रूटने क्षेत्ररक्षणात फारसे गांभीर्य बाळगले नाही; परंतु शमी-बुमरा जोडीने क्रिकेटमधील आक्रमक फटके खेळल्यावर इंग्लंड संघालाच नव्हे, तर ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. या सांघिक कामगिरीमुळे भारताचा विजय सुखकर झाला.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”