भारत विरुद्ध इंग्लडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अगदी शेवटची काही षटकं शिल्लक असताना भारताने विजय मिळवला. (सर्व फोटो : ट्विटर, आयसीसी, बीसीसीआयवरुन साभार) -
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली. आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडपुढे विजयासाठी ६० षटकांत २७२ धावांचे आव्हान ठेवले.
-
मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
-
शमीने कारकीर्दीतील झुंजार अर्धशतकी खेळी साकारताना जसप्रित बुमराच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात ८ बाद २९८ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेले.
-
उपाहारानंतर दुसऱ्याच षटकात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. मग गोलंदाजांनी ५१.५ षटकांत भारताचा लॉर्ड्सवर विजयाध्याय लिहिला.
-
६० षटकांचा सामना शिल्लक असतानाच भारताचा संघ मैदानामध्ये गोलंदाजीसाठी उतरला. सामन्याचे तिन्ही निकाल यावेळी शक्य होते.
-
विराटच्या सुचनेनुसार भारतीय संघ मैदानात उतरला आणि त्यांनी इंग्लंडची दाणादाण उडवून दिली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्याच षटकात इंग्लंडची २ बाद १ अशी केविलवाणी अवस्था केली.
-
रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ली या सलामीवीरांना अनुक्रमे बुमरा आणि शमी यांनी भोपळाही फोडू दिला नाही. मग हसीब हमीद (९) आणि रूट यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४३ धावांची भागीदारी केली. इशांतनेच हमीद आणि जॉनी बेअरस्टो (२) यांना पायचीत करून इंग्लंडच्या आव्हानातील हवाच काढून घेतली.
-
बुमराने चिवट फलंदाज रूटला ३३ धावांवर दुसऱ्या स्लीपमध्ये कोहलीकरवी झेलबाद करून इंग्लंडला आणखी एक हादरा दिला.
-
६७ धावांवर निम्मा संघ गारद झाल्यानंतर जोस बटलर (१५) आणि मोईन अली (१३) यांनी १५.४ षटकांत २३ धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले.
-
सिराजने मोईनला बाद करून ही जोडी फोडली. मग पुढच्याच चेंडूवर त्याने सॅम करनला शून्यावर बाद केले. करन सलग दुसऱ्या डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.
-
इशान शर्मानेही भन्नाट गोलंदाजी करत शमी आणि बुमराहला उत्तम साथ दिली.
-
बटलरने ऑली रॉबिन्सनच्या (९) साथीने १२.३ षटकांत ३० धावांची भागीदारी करून सामना अनिर्णीत राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण बुमराने पायचीत करून भारताच्या आशा जिवंत राखल्या.
-
पुढच्याच षटकात सिराजने ९६ चेंडूंत २५ धावा काढून मैदानावर टिकाव धरणाऱ्या बटलरचा अडसर दूर केला अणि तीन चेंडूच्या अंतराने जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवून इंग्लंडच्या दुसऱ्या डावापुढे पूर्णविराम दिला.
-
सर्व गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराजच्या कामगिरीची चांगलीच चर्चा झाल्याचं पहायला मिळालं.
-
सिराजने पहिल्या डावामध्ये ९४ धावांच्या मोबदल्यात चार बळी घतले. तर दुसऱ्या डावामध्येही सिरजाने अवघ्या ३२ धावा देत इंग्लंडच्या चार खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.
-
सामना जिंकण्यासाठी आवश्यक असणारी जेम्स अॅण्डरसनची विकेटही सिराजनेच घेतली.
सिराजच्या कामगिरीबरोबरच आणखीन एक गोष्ट चर्चेत असते ती म्हणजे त्याने तोंडावर बोट ठेऊन केलेलं अनोखं सेलिब्रेशन. -
प्रत्येक विकेट घेतल्यानंतर सिराज तोंडावर बोट ठेऊन म्हणजेच एखाद्याला गप्प राहण्याचा इशारा करतात तसं तोंडावर बोट ठेवून धावत आनंद साजरा करतो.
-
मात्र सिराजच्या या सेलिब्रेशनचा नक्की अर्थ काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. यासंदर्भात पहिल्या डावानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने या सेलिब्रेशनमागील कारण सांगितलं होतं.
-
सिराजने हे सेलिब्रेशन मी माझ्या टीकाकारांसाठी करतो असं सांगितलं. मी काहीच करु शकत नाही अशी सातत्याने टीका करणाऱ्यांना मी सेलिब्रेशनमधून उत्तर देतो असं सिराज म्हणाला.
-
"ती सेलिब्रेशनची स्टाइल ही माझ्या टीकाकारांसाठी आहे. ते माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलायचे. मी काही करु शकत नाही असं ते म्हणायचे. म्हणून मी त्यांना माझ्या गोलंदाजीने उत्तर देण्याचं ठरवलं," असं सिराज सांगतो.
-
"इंग्लंडमधील परिस्थिती पाहता येथे वेगवान गोलंदाज फार महत्वाची भूमिका बजावू शकतात. आम्ही एकाच टप्प्यामध्ये गोलंदाजी करत आहोत. मी कायम एका ठराविक ठिकाणीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मी रणजीमध्येही अशीच गोलंदाजी करायचो," असं सिराजने यावेळी आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना सांगितलं होतं.
-
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचले. त्यामुळे शमी-बुमराची कामगिरी अधिक उंचावली आणि आपोआपच सर्व खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार झाला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर व्यक्त केली.
-
लॉडर्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला १५१ धावांनी धूळ चारली. दुसऱ्या डावात शमी आणि बुमरा यांनी नवव्या गड्यासाठी रचलेली ८९ धावांची भागीदारी भारताच्या विजयात मोलाची ठरली. यादरम्यान ऑली रॉबिन्सन आणि जोस बटलर अनेकदा शमी-बुमरा यांना डिवचताना आढळले.
-
‘‘संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉडर्सवर विजय मिळवणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला ६० षटकांत गुंडाळू, याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,’’ असे कोहली म्हणाला.
-
‘‘दुसऱ्या डावात शमी-बुमरा यांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंनी विनाकारण डिवचल्यामुळे मीसुद्धा ड्रेसिंग रूममध्ये संतप्त झालो. मात्र तेथून शमी-बुमरा यांनी सुरेख फलंदाजी केली आणि मग गोलंदाजीसाठी मैदानावर उतरताच त्यांनी इंग्लंडची त्रेधातिरपीट उडवली. त्यांचा जोश पाहून संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास बळावला,’’ असेही कोहलीने सांगितले.
Donald Trump: “…तेव्हाच परत या”, झेलेन्स्कींना बाहेरचा रस्ता दाखवत डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?