-
इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.
-
५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारतीय संघाने विजयी पताका फडकावला.
-
भारतीय संघ सपाट खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता.
-
मात्र भारतीय गोलंदाजांनी हा अंदाज चुकीचा ठरवत इंग्लंडच्या संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम केला.
-
यामध्ये सर्वच भारतीय गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी केली असली तरी जसप्रीत बुमराने लंच ब्रेकनंतर केलेल्या भन्नाट गोलंदाजीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली.
-
रविवारच्या बिनबाद ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्सचा (५०) अडथळा दूर केला.
-
डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला. १४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली.
-
जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो आणि ऑली पोपला तंबूत परत पाठवलं.
-
बुमराने बेअरस्टोला एकही धाव न करता क्लीन बोल्ड करत तंबूत पाठवलं
-
तर ऑली पोपला अवघ्या २ धोवांवर त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला.
-
फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. मात्र शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला.
-
ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हर्टन (१०) यांनी थोडा वेळ भारताचा विजय लांबवला. मात्र उमेश यादवने या दोघांना माघारी पाठवले.
-
अखेर ९३ व्या षटकात उमेशनेच जेम्स अँडरसनला बाद केले आणि कोहलीसह सर्व खेळाडू आणि स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
-
विशेष म्हणजे लंच ब्रेकनंतर सामन्यामध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं. यासाठी बुमराने टाकलेला भन्नाट स्पेल कारणीभूत ठरला.
-
बुमरासमोर जगभरातील फलंदाज फारसे प्रभावी ठरत नाहीत. खास करुन त्याच्या यॉर्करसमोर तर फलंदाजाने विकेट टिकवणे एवढं काम जरी यशस्वीपणे केलं तरी फार झालं असं त्याचे चाहते म्हणतात.
-
सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम यॉर्कर टाकणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांमध्ये बुमराचा समावेश होतो.
-
पण तुम्हाला बुमरा एवढे खतरनाक यॉर्कर टाकायला कसा शिकला हे जाणून तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल.
-
त्यातही विशेष गोष्ट म्हणजे जगभरातील फलंदाजांची झोप उडवणारे हे यॉर्कर शिकण्यामागे बुमराची आई कारणीभूत आहे असं सांगितल्यास तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.
पण हे खरं आहे बुमरानेच आपल्या आईची ही सवय आणि यॉर्कर शिकण्याबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं. -
बुमरा आईचा फार लाडका आहे.
-
तो अनेकदा आपल्या आई आणि बहिणीसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतो.
-
लग्नानंतर बुमराने शेअर केलेला हा फोटोही चांगलाच चर्चेत आला होता.
-
अगदी बालदिन असो किंवा आईचा वाढदिवस असो बुमरा आईबद्दल अनेकदा सोशल मीडियावरुन जुने फोटो शेअर करत व्यक्त होताना दिसतो.
-
बुमराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे आईसोबतचे अनेक फोटो पहायला मिळतात.
-
आज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या बुमराला त्याची भन्नाट शैली शिकवण्यामागे आईचं अगदीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने योगदान राहिलं आहे.
-
खास करुन चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे यॉर्कर बुमरा आईमुळेच शिकल्याचं त्यानेच एका मुलाखतीत सांगितलंय.
-
बुमराचे बालपण अहमदाबादमध्ये गेलं.
-
बुमराला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.
-
पण बुमरा घरातच प्रॅक्टीस करायचा.
-
अगदी मोजक्या जागेत बुमरा गोलंदाजीचा सराव करायचा म्हणूनच आजही त्याचा रनअप फारच छोटा आहे.
-
कमी जागेत आणि थेट टप्पा न पडू देता चेंडू टाकण्यास बुमरा हळूहळू लहानपणी सरावादरम्यानच शिकला.
-
घरामध्ये रबरी चेंडूने गोलंदाजीचा सराव करताना बुमरा भिंत आणि फरशी जिथे काटकोनात एकमेकांना मिळतात तिथे सातत्याने चेंडू टाकण्याचा सराव करायचा.
-
मात्र घरातच सराव करायचा असल्याने आईचा ओरडा खावा लागू नये या हेतूने तो चेंडू टप्पा पडून आवाज होऊ नये म्हणून तो अगदी वेगळ्या पद्धतीने सराव करायचा.
-
चेंडूचा कमीत कमी आवाज व्हावा या हेतूने थेट भींत आणि फरशी काटकोनामध्ये मिळतात तिथे चेंडू टाकण्याचा सराव करायचा.
-
“आम्ही तेव्हा रबरी चेंडूने खेळायचो ते फार वेगाने वळायचे,” असं बुमराने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
-
“आम्ही तेव्हा खेळपट्टीवर खेळायचो नाही. त्यामुळे चेंडू वळणे किंवा लेंथ बॉल्स किंवा इतर तांत्रिक गोष्टी तेव्हा नव्हत्या,” असंही त्याने म्हटलं होतं.
-
“केवळ फलंदाजाच्या पायाशी फूल लेंथ डिलेव्हरी करणं एवढ्या एकाच हेतूने आम्ही गोलंदाजी करायचो,” असं बुमराह म्हणाला.
-
“तुम्हाला विकेट घ्यायच्या असतील तर तुम्हाला यॉर्कर टाकावेच लागतील. मला आजही वाटतं की या लहानपणाच्या सरावाचा प्रभाव माझ्या गोलंदाजीवर जाणवतो,” असं बुमरा म्हणाला होता.
-
“तसेच रबरी चेंडूने खेळताना फलंदाज तुमच्या गोलंदाजीवर तुटून पडण्याची शक्यता असल्याने तुम्ही सतत त्याला चकवण्याचा प्रयत्न करता आणि तेच मी आताही करतो,” असं बुमरा म्हणाला होता.
-
म्हणजेच आई आवाज झाल्यावर ओरडेल या एका भीतीपोटी लागल्या सवयीमुळे आज बुमराला गोलंदाजीची आणि यॉर्करची स्वत:ची शैली सापडलीय. हे सारं वाचल्यावर खरोखरच एक आंतरराष्ट्रीय गोलंदाज असलेल्या बुमराच्या आजच्या भन्नाट गोलंदाजीसाठी त्याच्या आईचेच चाहत्यांनी आभार मानले पाहिजे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
दरम्यान, भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत चार सामन्यांनंतर २-१ ने आघाडी मिळवली आहे.,
-
बुमरा आणि इतर गोलंदाजांनी चौथ्या कसोटीसारखीच कामगिरी शेवटच्या कसोटीतही केली तर भारत ही मालिका ३-१ च्या फरकाने जिंकू शकतो.
-
१० तारखेपासून मँचेस्टरमध्ये मालिकेतील अखेरची कसोटी सुरु होणार आहे.
-
विजयी धौडदौड कायम ठेवण्यासाठी १० तारखेला भारतीय संघ मैदानात उतरले.
-
तर मालिका अनिर्णित राखण्यासाठी इंग्लंडा हा पाचवा सामना जिंकणं अनिवार्य असणार आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल