-
दिवाळीचा प्रकाशमय सण काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच दुबईत भारतीय संघाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचे दिवाळे निघाले. एकापेक्षा एक रत्नांचा समावेश असलेल्या भारतीय फलंदाजांच्या फळीची भंबेरी उडाली.
-
त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर आठ गडी आणि ३३ चेंडू राखून आरामात विजय मिळवला.
-
भारताने दिलेले १११ धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने १४.३ षटकांत गाठले. सलामीच्या लढतीत पाकिस्तानपुढे लोटांगण घालणाऱ्या भारतीय संघाचे सलग दुसऱ्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
-
सध्या भारत गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून न्यूझीलंडने मात्र पहिल्या विजयासह तिसरे स्थान पटकावले.
-
असं असलं तरी भारतासाठी आता त्यांच्या पुढील तीन सामन्यांपेक्षा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील सामन्याच्या निर्णयाकडे लक्ष असेल. कारण हाच सामना भारत या स्पर्धेत टिकून राहणार की जाणार हे ठरवणार आहे. जाणून घेऊयात नक्की काय आहे हे गणित…
-
रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
-
भारताने या लढतीसाठी संघात दोन बदल करताना सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार यांच्या जागी अनुक्रमे इशान किशन, शार्दूल ठाकूर यांना संधी दिली. परंतु अनुभवी रोहित शर्माच्या जागी किशनला सलामीला पाठवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला.
-
ट्रेंट बोल्टने किशनला (८ चेंडूंत ४ धावा), तर टिम साऊदीने के. एल. राहुलला (१६ चेंडूंत १८) पॉवरप्लेच्या षटकांतच माघारी पाठवून भारतावर दडपण टाकले. मग लेगस्पिनर सोधीने तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित (१४ चेंडूंत १४) आणि कर्णधार विराट कोहली (१७ चेंडूंत ९) हे दोन महत्त्वाचे बळी मिळवून भारताच्या डावाला खिंडार पाडले.
-
हार्दिक पंडय़ा (२४ चेंडूंत २३) आणि ऋषभ पंत (१९ चेंडूंत १२) यांनाही धावगतीचा वेग वाढवता आला नाही. अखेरच्या षटकांत रवींद्र जडेजाने १९ चेंडूंत नाबाद २६ धावा फटकावल्याने भारताने किमान तीन आकडी धावसंख्या गाठली.
-
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने देहबोली खालावलेल्या भारतीय संघावर सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिले. जसप्रीत बुमराने मार्टिन गप्टिलला (२०) बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले.
-
मात्र डॅरेल मिचेल (४९) आणि विल्यम्सन (नाबाद ३३) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भर घालून भारताच्या आशांना सुरुंग लावला. बुमरानेच मिचेलला बाद केल्यावर विल्यम्सनने डेव्हॉन कॉन्वेच्या (२) साथीने न्यूझीलंडचा विजय साकारला.
-
भारतीय संघ या स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यांमध्ये चांगला खेळला होता. मात्र त्यानंतर मुख्य सामन्यांमध्ये आधी भारताला पाकिस्तानने पराभूत केलं आणि नंतर न्यूझीलंडकडूनही भारताचा मानहानीकारक पराभव झाला
-
पाकिस्तानने तर दुसऱ्या गटामधील तिन्ही प्रबळ संघांना म्हणजे भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत करत पुढील फेरीत आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे.
-
विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला न्यूझीलंडला पराभूत करणं यंदाही जमलं नाही आणि एकाप्रकारे बाद फेरीत सामना समजला जाणारा महत्वाचा सामना भारताने गमावला.
-
हा पराभव मोठा असल्याने पुढील फेरीत जाण्याच्या भारताच्या आशा फारच धूसर असल्या तरी त्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत.
-
भारत या स्पर्धेतील पुढील फेरीमध्ये जाऊ शकतो मात्र त्यासाठी या दुसऱ्या गटामधील सामन्यांचे निकाल भारताला फायदा होईल असे लागणे गरजेचे आहेत.
-
मूळात भारताला आता त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. एक जरी सामना भारताने गमावला तर भारत पुढे जाऊच शकणार नाही.
-
३ नोव्हेंबर रोजी भारत अफगाणिस्तानविरोधात, पाच नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडविरोधात तर आठ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरोधात खेळणार आहे.
-
मात्र भारताचं काय होणार याचा निकाल संघाचा सामना नसताना म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कारण या दिवशी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा सामना होणार आहे.
भारताने आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तर एकूण सहा गुणांची कमाई विराटच्या संघाला करता येईल. तसेच सामने दुबळ्या संघांविरोधात असले तरी ते भारताला मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. -
यामुळे सहा गुण असले तरी भारताचा नेट रनरेट अधिक उत्तम ठरेल आणि भारत या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचले. तर असं झाल्यास न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान पुढील फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतील.
-
आता हे तर झालं भारताच्या हाती असणारं गणित. पुढे आपण इतरांवर निर्भर कसे आहोत आणि त्यांच्या सामन्यांचा काय निकाल लागल्यावर काय होईल हे पाहूयात.
-
दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे दोन गुण आहेत. त्यांचे उरलेले सामने भारताप्रमाणेच अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरोधात आहेत.
-
न्यूझीलंडच्या संघाने भारताला ज्या प्रकारे पराभूत केलं ते पाहता ते नामिबिया आणि स्कॉटलंडला सहज पराभूत करतील असा चाहत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर पण सहा गुण जमा होतील.
आता ज्यांच्या हाती भारताची दोर आहे तो संघ म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचे सुपर १२ मधील दोन सामने बाकी आहेत. एक भारताविरोधात आणि एक न्यूझीलंडविरोधात. -
भारताने ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानला पराभूत केलं तर त्यांचे गुण चारच राहतील. तर भारताच्या खात्यावर दोन गुण जमा होतील.
-
असं झाल्यास न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या सामन्याच्या निकालावरुन भारत स्पर्धेत टीकणार की घरी परतणार हे ठरणार.
-
न्यूझीलंडने अफगाणिस्तानविरोधातील सामना जिंकला तर पाकिस्तानसोबत पुढच्या फेरीत जाणारा तो ग्रूप टूमधील दुसरा संघ ठरेल आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर जाईल.
-
मात्र अफगाणिस्तानने या सामन्यात केन विल्यमसनच्या संघाला पराभूत केलं तर भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होतील.
-
या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम नेट रनरेट असणारा संघ पुढील फेरीत जाणारा दुसरा संघ ठरेल. यामध्ये भारताला पुढील फेरीत जाण्याची संधी मिळू शकते. (फोटो ट्विटरवरुन साभार)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?