-
रविवारी म्हणजेच १४ तारखेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असा टी २० विश्वचषकामधील अंतिम सामना होणार हे निश्चित झालं आहे.
-
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तर न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र पाकिस्तान आणि इंग्लंड दोन्ही संघ हे या स्पर्धेतील प्रमुख दावेदार उपांत्य फेरीतच बाहेर पडलेल्यानंतर अनेकांनी पाकिस्तान आणि इंग्लंडच्या आजी माजी खेळाडूंना ट्रोल केलं आहे.
-
अशाचप्रकारे भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला एक शब्दिक चिमटा काढलाय. सध्या त्याचं हे मीम स्वरुपातील उत्तर तुफान व्हायरल होतंय.
-
जाफर हा त्याच्या भन्नाट ट्विट्स आणि मीम्ससाठी भारतीयच नाही तर जगभरातील नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने याच भन्नाट मीमचा वापर करत इंग्लंड स्पर्धेमधून बाहेर पडल्यानंतर अती आत्मविश्वास दाखवणाऱ्या पीटरसनला एका जुन्या पोस्टची आठवण करुन देत टोला लगावलाय. जाफर काय म्हणालाय ते पाहूयातच पण आधी हे दोन प्रमुख दावेदार कसे बाहेर पडले ते जाणून घेऊयात…
-
मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
-
उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत गाठले.
-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (४९) आणि मिचेल मार्श (२८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले.
-
मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (७) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी ८१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
-
त्याआधी, पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ अशी धावसंख्या उभारली. मोहम्मद रिझवान (६७) आणि कर्णधार बाबर आझम (३९) या भरवशाच्या सलामीवीरांनी डावाची चांगली सुरुवात केली.
-
त्यांनी ७१ धावांची सलामी दिल्यावर आझमला अॅडम झॅम्पाने बाद केले. रिझवानने मात्र उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवताना या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याला डावखुऱ्या फखर झमानची (नाबाद ५५) तोलामोलाची साथ लाभली.
-
तर यापूर्वी म्हणजेच बुधवारी न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या संघाला धूळ चारत पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
-
दोन वर्षांपूर्वी लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आले.
-
डॅरेल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२) आणि जिमी नीशाम (११ चेंडूंत २७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने बुधवारी म्हणजेच १० नोव्हेंबर २०२१ रोजी इंग्लंडचा पाच गडी व एक षटक राखून पराभव करत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
-
अबू धाबी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठले. ख्रिस वोक्सने सलामीवीर मार्टिन गप्टिल (४) आणि कर्णधार केन विल्यम्सन (५) यांना माघारी पाठवले. पण मिचेलला डेवॉन कॉन्वेची (४६) उत्तम साथ लाभली.
-
लियम लिव्हिंगस्टोनने कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स (२) यांना बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकले. मात्र, अखेरच्या चार षटकांत ५७ धावांची गरज असताना नीशामने ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २३ धावा (२ वाइड आणि २ लेग बाय) फटकावल्या.
-
तसेच न्यूझीलंडने पुढील दोन षटकांत ३४ धावा करत हा सामना जिंकला. मिचेलच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
-
तत्पूर्वी, इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली होती. जोस बटलर (२४ चेंडूंत २९) आणि जॉनी बेअरस्टो (१७ चेंडूंत १३) चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतले.
-
मात्र, मोईन आणि डेविड मलान (३० चेंडूत ४१) यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी रचल्यावर मलानला टीम साऊदीने बाद केले. मोईनने नाबाद अर्धशतकासह इंग्लंडला १६५ धावांचा टप्पा पार करून दिला होता.मात्र ही धावसंख्या न्यूझीलंडच्या फटकेबाजीपुढे अपुरी पडली आणि इंग्लंडचा पराभव झाला.
-
इंग्लंडच्या याच पराभवानंतर वसीम जाफरने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या फोटोवर मजकूर लिहिलेलं मीम शेअर करत केविन पीटरसनला टोला लगावला आहे.
-
पीटरसन हा भारतीय क्रिकेटपटूंवर अनेकदा निंदा करताना आणि भारतीय चाहत्यांना डिवचताना दिसतो.
-
तो ट्विटरवर प्रचंड सक्रीय असून टी-२० विश्वचषकासंदर्भात अनेक पोस्ट तो दररोज करत असतो. यामध्ये आपली मतं, टोले, टोमणे यासाऱ्यांचा समावेश असतो.
-
केविन पीटरसनने २ नोव्हेंबर रोजी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान या दोनच टीम इंग्लंडला पराभूत करु शकतात असा अती आत्मविश्वास व्यक्त केलेला.
-
शारजाहमधील वापरलेल्या खेळपट्टीवर किंवा इतर कुठेही सामना खेळवण्यात आला तर चषक इंग्लंडच्या हाती द्यावा, असं पीटरसन म्हणाला होता.
-
पीटरसनच्या या ट्विटला इंग्लड स्पर्धेमधून बाहेर पडल्यानंतर वसीम जाफरने एक मीम शेअर करत उत्तर दिलंय. या मीममध्ये त्याने केन विल्यमसनचा फोटो वापरलाय.
-
चषक इंग्लडच्या हाती द्यावा म्हणणाऱ्या पीटरसनला केन विल्यमसन “हा आम्ही तर इथे फक्त बुर्ज खलिफा पहायला आलोय,” असं उत्तर देईल असं जाफर म्हणालाय.
-
जाफरचं हे मीम १ हजार ६०० हून अधिक जणांनी शेअर केलं आहे. विशेष म्हणजे पीटरसनचं मूळ ट्विट हे हजाराच्यावर शेअर झालं असताना त्यावर जाफरने दिलेला रिप्लाय अधिक शेअर झाल्याचं दिसत आहे.
-
पीटरसनने अजून जाफरच्या या ट्विटला रिप्लाय दिलेला नाहीय. पण इंग्लंडबद्दल तो ज्या आत्मविश्वासाने बोलले त्यामधील हवाच न्यूझीलंडने काढून टाकल्याने तो काही रिप्लाय देईल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीय. (सर्व फोटो ट्विटरवरुन आणि रॉयटर्सवरुन साभार)
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो