-
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. किरॉन पोलार्ड क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी तसेच अन्य कारणांमुळे चर्चेत राहिलेला आहे. सामना सुरु असताना त्याने पंच तसेच गोलंदाज यांच्यासोबत अनेकवेळा वाद घातलेला आहे.
-
२०१४ सालच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेला किरॉन पोलार्ड आणि बंगळुरुकडून खेळत असलेला मिचेल स्टार्क यांच्यात मैदानातच वाद झाला होता. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पोलार्डने मिचेलवर बॅट उगारली होती. यामुळे पोलार्डला सामन्याच्या फीसपैकी ७५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली होती. तर मिचेल स्टार्कलादेखील मॅचच्या फीसच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितले होते.
-
२०१५ च्या आयपीएलमध्येही किरॉन पोलार्डने पंचावर नाराजी व्यक्त केली होती. या हंगामातील एका सामन्यात ख्रिस गेल आणि पोलार्ड यांच्यात वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर पंचांनी किरॉन पोलार्डला शांत राहायला सांगितले होते.
-
त्यानंतर निषेध म्हणून पोलार्ड तोंडावर पट्टी लावून आला होता. सामन्यातील सहकाऱ्यांशी काही बोलायचे असल्यास तो तोंडावरची पट्टी काढून बोलत असे. नंतर लगेच तो पट्टी पुन्हा एकदा तोंडावर लावत असे.
-
२०१९ च्या आयपीएल हंगामात अंतिम सामन्यामध्ये किरॉन पोलार्डने पंचावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या अंतिम सामन्यामधील अंतिम षटकात मुंबईला धावांची गरज होती. यावेळी ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करत होता.
-
ब्राव्होने काही चेंडू वाईड टाकूनही पंचाने या चेंडूंना वाईड म्हणून जाहीर केले नव्हते. याच कारणामुळे ब्राव्होने आपली नाराजी व्यक्त केली होती. पोलार्ड थेट स्टंप्स सोडून बाजूला उभा राहिला होता. त्यानंतर पंचांनी समज काढल्यावर पुन्हा स्टंप्ससमोर त्याने खेळायला सुरुवात केली होती.
-
२०१७ च्या आयपीएलमध्येदेखील किरॉन पोलार्ड चांगलाच चर्चेत आला होता. त्याने माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. मांजरेकरांनी आपल्याबद्दल ब्रेनलेस असा शब्द उच्चारल्याचा समज पोलार्डला झाला. त्यानंतर कसलीही खात्री न करता पोलार्डने मांजरेकर यांच्यावर टीका केली होती.
-
२०२१ मधील आयपीएल हंगामातदेखील किरॉन पोलर्ड आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रसिध कृष्णा यांच्यात वाद झाला होता. मुंबई इंडियन्स संघ फलंदाजीसाठी आलेला असताना किरॉन पोलार्ड आणि प्रसिध कृष्णा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनीही एकमेकांवर शाब्दिक हल्ला केला होता.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना