-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. १५ जणांच्या संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक, चार अष्टपैलू, एक फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
-
तसेच दोन वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू आणि एक फलंदाज राखीव ठेवण्यात आला आहे.
-
या विश्वचषकात रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली, या तिघांवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, विश्वचषक संघात निवड झालेल्या खेळाडूंची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे, जाणून घेऊया.
-
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत १३६ टी-२० सामन्यांमध्ये ३१.७५ च्या सरासरीने ३६२० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-२० मध्ये सर्वाधिक चार शतके आहेत. याशिवाय त्याच्या नावावर २८ अर्धशतके आहेत. रोहितचा स्ट्राइक रेट १४०.६४ असून रोहितची टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या ११८ धावा आहे. मात्र, गेल्या टी-२० विश्वचषकानंतर आतापर्यंत रोहितने २० सामन्यांमध्ये ३०.६३ च्या सरासरीने केवळ ५८२ धावा केल्या आहेत.
-
आशिया चषकातदरम्यान विराट कोहलीचा फॉर्म परत आला आहे. यावेळी त्याने पहिले टी-२० शतकही झळकावले आहे. कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१.९४ च्या सरासरीने आणि १३८.३८ च्या स्ट्राइक रेटने ३५८४ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि ३२ अर्धशतके आहेत. गेल्या टी-२० विश्वचषकानंतर विराटने ९ टी-२० सामन्यांमध्ये १४२.८० च्या स्ट्राईक रेटने ३५७ धावा केल्या आहेत.
-
सूर्यकुमार हा गेल्या टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. १६ नोव्हेंबर २०२१ पासून आतापर्यंत त्याने भारतासाठी २० सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने आणि १७६.४७ च्या स्ट्राइक रेटने ६३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. सुर्याने आतापर्यंत २८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७३.२९ च्या स्ट्राइक रेटने ८११ धावा केल्या आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय होता. आशिया चषक स्पर्धेतही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. दुखापतीमुळे त्याची इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात निवड झाली नाही. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. राहुलचे फॉर्ममध्ये राहने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. राहुलने ६१ टी-२० मध्ये १४०.९२ च्या स्ट्राईक रेटने ९१६३ धावा केल्या आहेत. तसेच त्यांच्या नावावर दोन शतके आणि १७ अर्धशतके आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंतचा फॉर्म टी-२० फॉरमॅटमध्ये काही विशेष राहिलेला नाही. त्याने ५८ टी-२० १२६.३९ च्या स्ट्राइक रेटने ९३४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने केवळ तीन अर्धशतके झळकावली आहेत.
-
दिनेश कार्तिकने यावर्षी आयपीएलमध्ये अनेक चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच त्याने भारतीय संघातही अनेक महत्त्वाच्या मॅच जिंकून दिल्या आहेत. या विश्वचषकात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. कार्तिकने भारतासाठी ५० टी-२० सामन्यांमध्ये ५९२ धावा केल्या आहेत.
-
हार्दिक पंड्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजीबरोबच गोलंदाजीतही महत्त्वाची भूमिक पार पाडू शकतो. त्याने आतापर्यंत भारतासाठी ७० टी-२० सामने खेळले असून त्याने ८८४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५२ विकेट्सही घेतल्या आहेत.
-
दीपक हुड्डा लांब फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो ऑफ स्पिनरही आहे. दीपकने आतापर्यंत १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून २९३ धावा केल्या आहेत.
-
अश्विनची भूमिका या विश्वचषकात महत्त्वाची राहणार आहे. त्याने आतापर्यंत ५६ टी-२० सामने खेळले असून ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६१ धावाही केल्या आहेत.
-
अक्षर पटेलची भूमिकाही या विश्वचषकात महत्त्वाची असणार आहे. रविंद्र जडेजाच्या दुखापती मुळे अक्षरला या संघात स्थान मिळाले आहे. अक्षरने आतापर्यंत २६ टी-२० सामने खेळले असून १४७ धावा केल्या आहेत. याशिवाय २१ विकेट्सही घेतल्या आहेत.
-
गेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघात लेगस्पिनरची कमतरता होती. यंदा तीच चूक पुन्हा न करता भारतीय सघांत यझुर्वेंद्र चहलचा समावेश करण्यात आला आहे. चहलने आतापर्यंत ६६ टी-२० सामन्यांमध्ये भारताकडून ८३ बळी घेतले आहेत.
-
दुखापतीनंतर संघात परतलेल्या जसप्रित बुमराहला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. बुमराहने ५८ टी-२० मध्ये ६९ विकेट घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट सातपेक्षा कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर तो चांगली कारगिरी करण्याची शक्यता आहे.
-
भुवनेश्वर कुमार गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने २५ टी-२० सामन्यात ३४ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६.७४ आहे. त्याने आतापर्यंत ७७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८४ बळी घेतले आहेत.
-
गेल्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर हर्षल पटेलने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याने भारतासाठी १७ टी-२० सामन्यांमध्ये २३ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर टीम इंडियासाठी हर्षल महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.
-
अर्शदीप सिंग हा भारतीय संघात एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध त्याने २० व्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. अर्शदीपने आतापर्यंत ११ टी-२० सामने खेळले असून १४ विकेट्स घेतल्या आहेत.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”