-
महिला भारतीय संघाची आघाडीची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने काल एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचा सामना खेळत आपल्या २० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केले. झुलन गोस्वामीनं आतापर्यंत १२ कसोटी, २०३ एकदिवसीय आणि ६८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय.
-
झुलनची क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. दोन दशके भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने जागतिक क्रिकेटमध्ये अमीट ठसा उमटवला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून तिने ३५२ हून अधिक बळी मिळवले आहेत.
-
या छायाचित्रात भारतीय महिला संघाची नवी पिढी शिखा पांडे या तरुण गोलंदाजासोबत एक फोटो शेअर केला आहे. यातूनच कळते की तिने भारताच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत नवा मार्ग दाखवला आहे. झुलनकडून प्रेरणा घेऊन आता भारतातील अनेक मुलींनी क्रिकेटपटू होण्याचे आणि तिच्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्याचे स्वप्न बाळगले आहे.
-
काही महिन्यांपूर्वी मिताली राज आणि आता झुलन, या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटमधील एका पर्वाची खऱ्या अर्थाने अखेर झाली आहे. दोघींनीही भारतीय महिला क्रिकेट मधील अनेक चढउतार पहिले आहेत. त्या दोघींमुळेच खऱ्या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटला सुगीचे दिवस आले असे म्हणता येईल.
-
२० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत झुलनला अनेक विश्वचषकांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तिचा समावेश असलेल्या भारतीय संघाने २००५ आणि २०१७च्या महिला एकदिवसीय विश्वचषकांची अंतिम फेरी गाठली होती, मात्र काही कारणास्तव भारताला विश्वचषक जिंकता आला नाही.
-
क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला संघाने शनिवारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला निर्भेळ यशाची भेट दिली. भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच ३-० अशी मालिका जिंकली. याधी १९९९ साली त्यांनी २-१ अशी मालिका जिंकली होती.
-
अनेक दिग्गजांनी तिचे अभिनंदन केले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलनला एक दिग्गज खेळाडू म्हणून सन्मानित केले आहे. झुलनने ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचाही मान मिळवला. लवकरच तिच्यावर ‘चकदा एक्सप्रेस’ नावाचा हिंदीत चित्रपट येणार आहे.
-
कालच्या सामन्यात सामन्याआधीच्या संघ मिटिंगमध्ये सर्व महिला खेळाडू एकत्र येऊन तिला निरोप देत होत्या. त्यावेळी अनेकींना आपल्या भावना अनावर झाल्या. यावेळी प्रत्येक खेळाडूने झुलनविषयी मत मांडले.
-
झुलन आतापर्यंत अनेक भारतीय संघाच्या कर्णधारांसोबत खेळली आहे. तिची सुरुवात ही अंजुम चोप्रा या कर्णधारापासून झाली होती. तिनेच २००२ साली तिला भारतीय संघाची टोपी प्रदान केली होती. अंजुम चोप्रा ते हरमनप्रीत कौर हा झुलनचा प्रवास दोन पिढ्यांना प्रेरणादायी ठरला आहे.
-
कालच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही झुलनला आपल्या सोबत नाणेफिकीसाठी घेऊन गेली होती. यावेळी तिला देखील अश्रू अनावर झाले. तिने झुलनला कडकडून मिठी मारली.
-
झुलन जेव्हा मैदानावर आली तेव्हा तिला भारतीय तसेच इंग्लंड खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर देत तिचा सन्मान केला. त्यावेळची ही काही क्षणचित्रे…
-
बॉलगर्ल ते सुपर‘फास्टर’ अशी ओळख निर्माण करणारी ती भारतीय संघाची एकमेवाद्वितीय अशी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे. असे खेळाडू एकदाच होतात. ‘गुडबाय झुलन’…
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”