-
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक कुस्तीगीरांना त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले आहे.
-
भाजपाचे खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह हे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्यामुळे राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता.
-
आज दिल्लीतील जंतर मंतर येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारताचे आघाडीचे पदक विजेते मल्ल आंदोलनास बसले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांची महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी, अशी एकमुखी मागणी मल्लांच्यावतीने करण्यात येत आहे.
-
आंदोलनकर्त्यांमध्ये बजरंग पूनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, अंतिम पंघाल, रवि दहिया, दीपक पूनिया, संगीता फोगात, बबिता फोगाट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगाट यांच्यासह देशातील ३० मल्लांचा समावेश आहे.
-
तर दुसरीकडे ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी चौकशीला तयार असल्याचे त्यांनी सांगितले असून मी जर दोषी असेल तर मला फाशी द्या, असही त्यांनी जाहीर करुन टाकले.
-
काही दिवसांपूर्वीच ब्रिजभूषण सिंह हे ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात आले होते. तेव्हा कुस्ती आणि खेळाडूंच्या भविष्याबाबत त्यांनी खूप काही सांगितले. त्यांच्या सूचनांचा स्वीकार करत उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीसाठी विशेष निधी देऊन खाशाबा जाधव यांच्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे मल्ल तयार करु, असे उत्तर दिले होते.
-
विनेश फोगाट आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाली की, टोकयो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा मी पराभूत झाले तेव्हा बृजभूषण सिंह यांनी मला ‘खोटा शिक्का’ असल्याचा शेरा मारला. त्यांनी माझे मानसिक खच्चीकरण केले. मी रोज मला स्वतःला संपविण्याचा विचार करायचे. जर आमच्यापैकी एकाही मल्लाला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी WFI चे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांची असेल.
-
कुस्ती महासंघ मल्लांना त्रास देण्याचे काम करत आहे. जे लोक कुस्ती महासंघात बसले आहेत, त्यांना खेळाविषयी काही ममत्व नाही. आम्ही आता ही हुकूमशाही आणखी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया बजरंग पुनिया याने दिली.
-
विनेश फोगाटची बहिण आणि कुस्तीपटू बबिता फोगाट देखील या आंदोलनात सामील झाली आहे.
-
तर ऑलम्पिक पदक विजेती साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही कुस्ती महासंघाच्या बेबंदशाहीविरोधात एकवटलो आहोत. सर्व मल्ल आमच्या पाठिशी आहेत.
-
ब्रिजभूषण सिंह महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करतात, अशी तक्रार अनेक खेळाडू माझ्याकडे करत आहेत, असा खळबळजनक आरोप विनेश फोगाट यांनी केला आहे.
-
भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह हे बाहुबली समजले जातात. उत्तर प्रदेशमधून ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०११ पासून ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर