-
देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, हॅलो, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली. या निर्णयानंतर चीनने आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचा संदर्भ देत याचा विरोध केला. मात्र भारताच्या या निर्णयावर आरडाओरड करणाऱ्या चीनमध्येच इंटरनेटसंदर्भातील कठोर नियम अस्तित्वात आहेत.
-
इंटरनेटवरील जाणकार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती याला ग्रेट फायरवॉल ऑफ चायना असं म्हणतात. चीनमधील नियमांनुसार जगभरात लोकप्रिय असणाऱ्या अनेक वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग अॅप्स वापरण्यास बंदी आहे. अनेक जण व्हिपीएन म्हणजेच व्हर्चूअल प्रायव्हेट नेटवर्कच्या आधारे या वेबसाईट पाहतात. मात्र सामान्यांना या वेबसाईट वापरण्याची परवानगी नाही. यापैकी काही साईट या सोशल नेटवर्किंगच्या आहेत तर काही बातम्यांच्या. चीनमध्ये इंटरनेट वापराचे स्वातंत्र्य नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांनी काय पहावे आणि काय नाही हे येथील सरकारी नियमांनुसार ठरवून दिले जाते. याच बंदीमुळे चीनमध्ये जगभरात वापरली जात नाही अशी बायडू, विबो यासारख्या वेगळ्याच सोशल नेटवर्किंगसाईट लोकप्रिय आहेत. मात्र आपण या गॅलरीमध्ये चीनने बंदी घातलेल्या वेबसाईट आणि अॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.
-
सर्व गुगल प्रोडक्ट – गुगल सर्व्हिसेस, युट्यूब आणि अगदी गुगल सर्च इंजिनवरही चीनमध्ये बंदी आहे. २०१० पासून चीनने या सेवांवर बंदी घातली आहे. एका दशकानंतरही परिस्थिती तशीच आहे.
-
गुगलच्या सेवांवर बंदी आल्याने चीनमध्ये गुगल मॅप्स काम करत नाही. त्यामुळेच या देशात भटकंतीसाठी जाणाऱ्यांना स्थानिक जीपीएस यंत्रणेवर अवलंबून रहावे लागते.
-
लोकांपर्यंत पोहचणाऱ्या माहितीवर निर्बंध घालण्यासाठी चीनने गुगलवर बंदी घातली. चीनमधील सत्ताधाऱ्यांनी तिआनानमेन प्रकरणाच्या २० व्या वर्षी म्हणजेच २००९ पासून अनेक वेबसाईटवर बंदी घालण्यास सुरुवात केली.
-
फेसबुक – शिनजियांग प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी सरकारविरोधी कारवाया करणाऱ्या काहीजणांनी संवाद साधण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी फेसबुकचा वापर केल्याचे २००९ साली उघड झाले. तेव्हापासून चीनने फेसबुकच्या वापरावर बंदी घातली आहे. सरकारविरोधी आंदोलने करण्यासाठी फेसबुकचा वापर झाला असा ठपका चीनने ठेवत बंदीचे हत्यार उपसले.
-
चीनमध्ये फेसबुकला परवानगी मिळावी म्हणून सध्या फेसबुक चीनच्या सेन्सॉरशीप प्रोजेक्टवर काम करत आहे. कंपनी थर्ड पार्टीला आपल्या साईटवरील कंटेटवर नियंत्रण ठेवण्याचे आणि इतर हक्क देणार आहे. यामाध्यमातून फेसबुकचा चीनमध्ये पुन्हा काम करता येणार आहे.
-
केवळ फेसबुकच नाही तर कंपनीच्या मालकीचे इतर अप्स ज्यामध्ये प्रामुख्याने जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अप म्हणजेच व्हॉट्सअपचाही समावेश आहे. देशात चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून व्हॉट्सअपवरही बंदी आहे.
-
विकिपीडिया – तिआनानमेन प्रकरणाला १५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पर्श्वभूमीवर चीनने विकिपिडियावर २००४ सालीच बंदी घातली. त्यानंतर विकिपीडियाला राजकीय लेख वगळता इतर लेखांसाठी परवानगी देण्यात आली. मात्र एप्रिल २०१९ मध्ये या वेबसाईटवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
-
विकिपीडिया या वेबसाईटवरील माहितीमध्ये तैवान हा स्वतंत्र देश असल्याची माहिती असल्याने चीनने विकिपीडियावर बंदी घातल्याचे सांगण्यात येते.
-
इन्स्टाग्राम – हाँगकाँगमध्ये सुरु असणाऱ्या अम्ब्रेला रेव्होल्यूशन या चीनविरोधी आंदोलनाचे फोटो इन्स्टाग्रामवर झळकू लागल्यानंतर या साईटवरही बंदी घालण्यात आली.
-
हाँग काँगमधील आंदोलनातील लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या पोस्टममुळे देशातील जनतेमध्येही सरकारविरोधात रोष निर्माण होईल या भीतीने इन्स्ट्राग्रामवर बंदी घालण्यात आली.
-
ट्विटर – सन २००९ पासून चीनमध्ये ट्विटरवर बंदी आहे. ट्विटरच्या जागी चीनमध्ये अशीच सेवा पुरवणारे वीबो नावाची साईट लोकप्रिय आहे.
-
चिनी सरकार आणि धोरणांचा विरोध करणारा मजकूर रिट्विट करुन शेअर केल्याप्रमाणे एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देण्याचे प्रकारही चीनमध्ये घडले आहेत. २०१९ साली वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना चिनी धोरणांविरोधातील मजकूर, ट्विट आणि संपूर्ण अकाउंटच डिलीट करण्यासाठी भाग पाडलं जातं.
-
चीनमध्ये नेटफिक्सवरही बंदी आहे. मात्र या बंदीमागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. येथील नागरिकांना नेटफिक्सवरील चित्रपट आणि मालिका दिसत नाहीत.
-
द न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, हफिंग्टन पोस्ट, गार्डियन, डेली मेल या आणि अशा बऱ्याच बातम्यांच्या साईटवर चीनमध्ये बंदी आहे. चिनी धोरणे आणि राजकारण्यांवर टीका करणारे साहित्य आणि लेख चिनी नागरिकांना वाचता येऊ नयेत म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
-
विकिपिडीयावर चीनमध्ये बंदी घालण्यात आलेल्या वेबसाईटचं एक पेजच आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी https://en.wikipedia.org/wiki/List_of_websites_blocked_in_mainland_China या लिंकवर त्या पेजला भेट देऊ शकता.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल