-
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा भारतीयांना काय फायदा होणार आहे हे आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
पिचाई काय म्हणाले: “आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.
-
मोदींबरोबरच चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळीच ट्विटरवरुन सुंदर पिचई यांच्याबरोबरच अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली होती. "आज सकाळीच सुंदर पिचई यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. खास करुन आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतामधील शेतकरी, तरुण आणि नव्या उद्योजकांना कसा फायदा मिळवून दिला जाऊ शकतो यासंदर्भात चर्चा केली," असं मोदींनी ट्विट केलं होतं.
-
"करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये काम करण्याची पद्धत कशी बदलली आहे, ती कशी बदलत आहे याबद्दलही आम्ही चर्चा केली. या साथीचा खेळ विश्वाला कसा फटका बसला आहे याबद्दलही आम्ही बोललो. त्याचप्रमाणे माहिती सुरक्षा आणि सायबर सुरक्षेसंदर्भातही आम्ही चर्चा केली. भारतासंदर्भात गुगलचे काय धोरण आहे हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. शिक्षण, डिजीटल इंडिया, डिजीटल पेमेंट यासारख्या गोष्टींबद्दल गुगलचे धोरण काय आहे याबद्दल चर्चा झाली," असंही मोदी ट्विटवर म्हणाले.
-
मोदींच्या या ट्विटला सुंदर यांनी रिप्लाय देत तुमच्याबरोबर खूप छान चर्चा झाली असं म्हटलं. "तुमचं डिजीटल इंडियाचं ध्येय खूपच आशावादी आहे. त्यासंदर्भात आम्ही काम करत राहू. गुगलचे भारताबद्दलचे धोरण काय असेल यासंदर्भात लवकरच घोषणा करु," असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतरच काही तासांनी ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा ब्लॉगच्या माध्यमातून करण्यात आली.
-
“भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजीटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोकं स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत," असं पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.
-
"सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक काम बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे,” असंही पिचई यांनी स्पष्ट केलं.
-
“आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत," असा उल्लेख पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.
-
कशी करणार गुंतवणूक: "आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल," अशी माहिती पिचई यांनी दिली. या गुंतवणुकीमधून काय साध्य करण्याचं उद्दीष्ट गुगलने ठेवलं आहे यासंदर्भातही पिचाई यांनी माहिती दिली.
-
सर्व सामान्यांना यामधून मिळणाऱ्या गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात इंटरनेटची सेवा. "आम्ही सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये इंटरनेटची सेवा परवण्यासंदर्भातील काम करणार आहोत," असं पिचई म्हणाले आहेत.
-
दुसरी म्हत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:च्या भाषेमध्ये माहिती उपलब्ध करुन देण्याचे काम गुगल करणार आहे. "भारतीयांना स्वस्त आणि त्यांच्या स्वत:च्या भाषेमध्ये इंटरनेट उपलब्ध करुन देण्यासाठी काम करणार आहोत. यामध्ये मग हिंदी, तामिळ, पंजाबी याबरोबरच इतरही अनेक भाषांचा समावेश असेल" असं पिचाई म्हणाले आहेत. म्हणजेच यामुळे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील माहिती उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रयत्न करण्यात येतील.
-
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांच्या गरजेनुसार गुगल विशेष सेवा आणि प्रोडक्ट निर्माण करणार आहेत. भारतींच्या गरजा आणि वापर लक्षात घेऊन सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे पिचई यांनी म्हटलं आहे.
-
चौथी गोष्ट अशी की, भारतामधील उद्योजकांना डिजीटल माध्यमांच्या मदतीने मोठं होण्यासाठी आणि त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्यासंदर्भातील प्रकल्प गुगलकडून हाती घेतले जाणार आहेत.
-
गुगलकडून करण्यात आलेल्या घोषणांमधील सर्व सामान्यांना फायदा होणारी पाचवी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा समाजासाठी वापर. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या माध्यमातून समाज उपयोगी काम करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याचे गुगलने म्हटलं आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्रांमधील सुधारणांचा समावेश असेल.
-
"आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे,” असं पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल