महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांसह भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची शक्ती द्या असे साकडे भगवान बाबांकडे घातले. धनंजय मुंडे नारायण गड येथे दर्शन करून भगवानगड येथे हेलिकॉप्टरने आले असता, गडाच्या प्रवेशद्वारावर भगवानगड परिसरातील नागरिकांनी १११ किलो फुलांचा हार क्रेनद्वारे घालून धनंजय मुंडे यांचे भव्य स्वागत केले. भक्ती व शक्तीचा संगम समजल्या जाणाऱ्या भगवानगडाला मराठवाड्याचा राजकीय ऊर्जास्रोत मानले जाते. परंतु काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना येथे येण्यापासून अडवणूक करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु याच गडावर सन्मानाने निमंत्रित करण्यात आल्याने हा क्षण आपल्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच भगवानगडावर काही वर्षांपूर्वी दगड फेकले गेले मात्र आज गडाच्या महंतांनी स्वतः निमंत्रित करून बाबांचे आशिर्वाद घ्यायला मला गडावर बोलावले हे माझे भाग्य असून, ही किमया भगवनबाबांच्या मुळे घडू शकली. मी येथे राज्याचा मंत्री नाही तर बाबांचा भक्त म्हणून गडावर आलो आहे; या गडाला कधीही काहीही मागायची गरज पडू देणार नाही व भगवानगड हा कायम राजकारणमुक्तच राहील असं यावेळी धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं. धनंजय मुंडे यांचे भगवानगड येथील गुरू परंपरेत स्थान आहे. धनंजय हे गडाचे निस्सीम भक्त असून हा गड सर्व भक्तांना दर्शनासाठी कायम खुला आहे. मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे या गडावर कधीही राजकारण होणार नाही असे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांना गडाच्या वतीने संत भगवानबाबा व विठ्ठलाची प्रतिमा देऊन यावेळी नामदेव शास्त्री यांनी आशिर्वाद दिले. यावेळी 'भगवान बाबा की जय'च्या घोषणा देत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. धनंजय मुंडे यांच्यासोबत आ. बाळासाहेब आजबे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, प्रतापराव ढाकणे आदी उपस्थित होते.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”