दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिल्लीकरांनी भारतीय जनता पक्षाला सपशेल नाकारले आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आपलं तख्त सलग तिसऱ्यांदा राखलं. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आपच्या बाजूने जनाधार असल्याचं चित्र दिसू लागल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. दुपारपर्यंत आपचं सरकार बनणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं. पण, मतमोजणी सुरू असताना एकवेळ अशीही आली होती ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्वच आपच्या कार्यकर्त्यांची धाकधुक प्रचंड वाढली होती. -
दिल्लीत 'आप'च्या धडाक्यापुढे भाजपाचा निभाव लागू शकला नाही, दोन आकडी जागाही त्यांच्या खात्यात दिल्लीकरांनी दिल्या नाहीत. अवघ्या आठ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. तर, आपने तब्बल ६२ जागांवर विजय मिळवला. दोन्ही पक्षांमधील फरक जागांमध्ये खूप दिसत असला तरी यावेळी अनेक जागांवर उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. काही जागांवर विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली मते यांच्यातील अंतर अत्यंत कमी राहिलं, तर काही जागांवर अंतर खूप जास्त होतं. एक नजर मारुया पाच-पाच अशा जागांवर जेथे उमेदवारांमधील विजयी अंतर सर्वात जास्त किंवा सर्वात कमी राहिलं. सर्वप्रथम पाहुया मतांचं सर्वात जास्त अंतर असलेल्या पाच जागा –
-
1. बुरारी : या जागेवर आपच्या संजीव झा यांचा विजय झाला. दुसऱ्या क्रमांकावरील जेडीयू उमेदवार शैलेंद्र कुमार यांचा त्यांनी 88 हजार 158 मतांनी पराभव केला.
-
2 ओखला- शाहिनबाग परिसराचा समावेश असेलल्या या जागेवर आपच्या अमानतुल्लाह खान यांनी विजय मिळवला. भाजपाच्या ब्रह्म सिंह यांच्याशी त्यांची मुख्य लढत होती. दोघांमधील विजयाचं अंतर 71 हजार 827 मतांच राहिलं.
-
3. सीमा पुरी- या जागेवर आपच्या राजेंद्र पाल गौतम यांनी लोजपाच्या संत लाल यांचा 56 हजार 108 मतांच्या अंतराने पराभव केला.
-
4. मटिया महल- आपच्या शोएब इकबाल यांनी या जागेवर विजय मिळवला. भाजपाच्या रविंद्र गुप्ता आणि इकबाल यांच्यातील विजयी मतांचं अंतर 50 हजार 241 मतांचं आहे.
-
5. सुलतानपुर माजरा: उत्तर-पश्चिम दिल्लीची ही जागा आपच्या मुकेश कुमार अहलावत यांनी जिंकली. त्यांनी 48 हजार 052 मतांच्या अंतराने भाजपाच्या राम चंद्र चावरिया यांचा पराभव केला.
मतांचं सर्वात कमी अंतर असलेल्या पाच जागा – 1. बिजवासन- ही जागा आम आदमी पार्टीच्या खात्यात आली. आपच्या भूपेंद्र सिंह जून आणि भाजपाचे सत प्रकाश राणा यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. भूपेंद्र सिंह यांनी अवघ्या 753 मतांनी विजय मिळवला. -
2. लक्ष्मी नगर- या जागेवर भाजपाचे अभय वर्मा आणि आम आदमी पार्टीचे नितिन त्यागी यांच्यात कांटे की टक्कर होती. भाजपाने केवळ 880 मतांनी विजय मिळवला.
-
3. आदर्श नगर- या जागेवर आम आदमी पार्टीच्या पवन शर्मा यांनी विजय मिळवला. भाजपाच्या राज कुमार भाटिया यांना त्यांनी अवघ्या 1,589 मतांनी हरवलं.
4. कस्तूरबा नगर- आम आदमी पार्टीच्या मदन लाल यांनी येथून विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या रवींद्र चौधरी यांचा 3 हजार 165 मतांच्या अंतरांनी पराभव केला. -
5. पटपडगंज- दिल्ली सरकारमधील उप मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया व भाजपाच्या रवींद्र सिंह नेगी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणी सुरू झाल्यापासून आपने सर्वत्र आघाडी घेतली होती, पण मनिष सिसोदिया हे पहिल्या फेरीपासून काही अंतराने पिछाडीवर होते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर सिसोदिया यांच्यासह केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये टेन्शन वाढत होतं. सिसोदिया पिछाडीवर असल्यामुळे केजरीवाल यांच्यासह आपच्या कार्यकर्त्यांची धडधड प्रचंड वाढली होती. १० फेऱ्यांपर्यंत नेगी यांनी आघाडी घेतली होती. पण अखेर ११ व्या फेरीमध्ये सिसोदिया यांनी नेगी यांची आघाडी मोडीत काढत माफक आघाडी घेतली. त्यानंतर सिसोदिया यांनी आपली माफक आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आणि आपच्या सिसोदिया, केजरीवाल यांच्यासह आपच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सिसोदियांचा विजय होणार याबाबत खात्री होताच केजरीवाल आपच्या कार्यालयात पोहोचले आणि सर्व दिल्लीकरांचे I Love You म्हणत आभार मानले.
-
त्यानंतर रात्री उशीरा आम आदमी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचा एक जुना फोटो ट्विट करुन येत्या वर्षांमध्येही आमची अशीच साथ काम राहिल अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं.
-
कालचा(दि.११) दिवस केजरीवालांसाठी दुहेरी आनंद घेऊन येणारा ठरला, कारण त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवसह होता.
-
निवडणुकीतील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे I Love You म्हणत आभार मानले. दिल्लीकरांनी मोठ्या अपेक्षेने, विश्वासाने आम्हाला कौल दिला आहे. आपण सर्व मिळून यापुढे काम करुया, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”