-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी… (सर्व माहिती मराठी विश्वकोशातून साभार. देशपांडे, सु. र.; दिघे, वि. गो.)
-
वासुदेव यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील आहे. वासुदेव यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन करण्याआधी त्यांनी दोन ते तीन दिवस इंग्रजांशी लढा दिला. कर्नाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी फडके कुटुंब वास्तव्य आले. अनंतराव यांचे पुत्र बळवंतराव यांना शिरधोणमध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली. हेच वासुदेव बळवंत फडके.
-
वासुदेव यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५–६० या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वासुदवे यांचे माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या तीन ठिकाणी झाले. वासुदेव यांनी पाचवीनंतर इंग्रजीचे शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.
-
वासुदेव यांनी पहिली नोकरी जी. आय्. पी. रेल्वेमध्ये केली. वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांपुढे उगाच विनम्र होण्याची सवय त्यांना नसल्याने रेल्वेमधली नोकरी लगेच सुटली. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही याच स्वभावामुळे फार दिवस टिकली नाही. अखेर १८६३ साली वासुदेव लष्कराच्या हिशेबी खात्यात नोकरीला लागले. पुढील १६ वर्षे म्हणजेच २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत ते तिथेच कामाला होते. २१ फेब्रुवारी १८७९ रोजी त्यांनी लष्कारविरोधात बंड पुकारले. १८६५ साली त्यांची मुंबईहून पुण्यात बदली झाली. पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली.
-
वासुदेव काम करत असणाऱ्या कचेरीतील वातावरण अगदीच यांत्रिक होते. वासुदेव हे अत्यंत संवेदनशील होते. एकदा वेळेत रजा मंजूर न झाल्याने त्यांना आपल्या आजारी आईची भेट घेता आली नाही. त्यामुळे दुखी: झालेल्या वासुदेव यांनी यासंदर्भात थेट वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली होती. येथून त्यांच्यातील क्रांतिकारक जागा झाला.
-
१८७१ मध्ये पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना झाली. यामार्फत महादेव गोविंद रानडे यांनी स्वदेशी चळवळीसंदर्भात दोन व्याख्याने दिली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यामुळे फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी मिळाले. पुढे वासुदेव पुण्यात देशभक्तिपर व्याख्याने देऊ लागले. १८७६–७८ या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. दुष्काळाच्या कालावधीमध्ये प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांमुळे गरीब जनतेचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाःकार उडाला. वासुदेव यांनी पुणे, नगर, नाशिक या प्रदेशामध्ये अनेक दिवस पायी प्रवास करत लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या. “देशातील दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्यांची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे”, असा प्रचार त्यांनी सुरू केला.
-
एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी वासुदेव यांची इच्छा होती; पण त्यांच्या या कल्पेनेला कोणी साथ दिली नाही. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा दिला नाही; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम सुरु घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले.
-
२२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकारांना लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता.
-
रामोशी लुटालूट करण्यात निष्णात होते; पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती, देशप्रेम इ. काही ठाऊकच नव्हते. जी लूट मिळाली, ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले. मार्चच्या शेवटी म्हणजे अवघ्या दीड महिन्यामध्ये वासुदेव यांच्यासोबत केवळ दहा–पंधरा रामोशी उरले. अवघ्या काही सवंगडी बरोबर उरल्याने हताश अंतःकरणाने वासुदेव बळवंत पुण्यास परतले. तेथून उरळी कांचनला जाऊन त्यांनी रेल्वेमार्गाने सोलापूर गाठले. पुढे ते गाणगापूर मार्गे श्रीशैलम् येथील श्री मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले.
-
१७ एप्रिल १८७९ रोजी मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले. त्याच दिवशी वासुदेव यांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली. या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे वासुदेव बळवंतांनी आत्मसमर्पणाचा विचार सोडून दिला व पुन्हा पुण्याकडे जाण्याचे ठरविले.
-
रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिल्यांच्या पुढाऱ्याशी वासुदेव यांची भेट घालून दिली. सुमारे ५०० रोहिले इस्माईल खानसह वासुदेव यांना येऊन मिळाले. शिवाय रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली. अशा प्रकारे सुमारे ९०० माणसांचे पाठबळ वासुदेव यांच्या पाठीशी उभे राहिले. दरम्यान बंड पुकारणाऱ्या वासुदेव यांच्याबरोबर सरकारने वाटाघाटी सुरु करण्याची तयारी केली. मात्र वाटाघाटी पुऱ्या होणाच्या आधीच वासुदेव बळवंत गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली. सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅनीयलला त्या मोहिमेवर धाडले.
-
वासुदेव बळवंत हे धानुरला (गाणगापुरला) आहेत, असे समजताच त्याने गावाला वेढा दिला; पण वासुदेव तेथून पळून गेले; तथापि त्यांच्या मोहिमांची अनेक कागदपत्रे ब्रिटिशांच्या हाती लागली. त्यामध्ये मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नरचा खून, इतर यूरोपीयांचे खून, सरकारने १०,००० ते ५,००० पासूनची बक्षिसे जाहीर केल्याची कागदपत्रे, हैदराबादमधील मौलवी मुहम्मदसाहेब या प्रतिष्ठित गृहस्थास वासुदेवांची शिफारस करणारे एक पत्र अशा अनेक कागदपत्रांचा समावेश होता.
-
मौलवीसाहेब निजामाच्या सैन्यातील अरब, रोहिले आणि शीख यांच्या पलटणीचे मुख्य सेनाधिकारी होते. वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे डॅनीयलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेव यांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे डॅनीयलला २१ जुलै १८७९ रोजी वासुदेव यांचा ठावठिकाणा मिळाला. विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावातील एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले.
-
न्यायमुर्ती न्यूनहॅम यांनी वासुदेव यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८०च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव यांचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन येथील कारावासातच मरण पावले.
-
वासुदेवांचे खासगी जीवन फारसे सुखावह नव्हते. विद्यार्थिदशेत १८५९ साली त्यांनी सोमण घराण्यातील मुलीशी पहिले लग्न केले. तिच्यापासून त्यांना मथुरा नावाची मुलगी झाली. त्यांची पाहिली पत्नी १८७३ मध्ये मरण पावली. त्यानंतर त्यांनी १८७३ साली दुसरे लग्न गोपिकाबाई नावाच्या ९ वर्षांच्या मुलीशी केले; पण त्यांना फारसे वैवाहिक सुख लाभले नाही. गोपिकाबाई पुढे १९४० मध्ये निधन पावल्या. वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; तथापि भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ वासुदेव यांनीच रोवली.
-
वासुदेव यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभरात पसरली. याच कारणामुळे वासुदेव यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ असं म्हणतात. त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी शिरढोण या त्यांच्या जन्मगावी त्यांचा स्मारकस्तंभ उभारून करण्यात आला.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”