-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत असून त्यांचा दोन दिवसांचा भारत दौरा आज, सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरू होतोय. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नेर यांच्यासह त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. भारतात ट्रम्प यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना एका व्यक्तीच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये, त्याचा उत्साह ओसंडून वाहतोय. (सर्व छायाचित्र सौजन्य- वृत्तसंस्था एएनआय, आणि ट्विटर )
जगभरात ट्रम्प यांचे लाखो चाहते आहेत, त्याचसोबत त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याप्रमाणे भारतातही ट्रम्प यांचा एक जबरा फॅन आहे. -
ट्रम्प यांना देव मानणाऱ्या या चाहत्याने केंद्र सरकारकडे ट्रम्प यांच्या भेटीसाठी विनंती केली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घडवून द्यावी अशी मागणी त्याने केंद्र सरकारकडे केली आहे.
-
बुसा कृष्णा (Bussa Krishna) असे या व्यक्तीचे नाव असून, गेली अनेक वर्षे तो डोनाल्ड ट्रंप यांची उपासना करीत आहे.
तेलंगणमधील एका गावात राहणारा ३३ वर्षीय बुसा कृष्णा हा डोनाल्ड ट्रम्प यांचा इतका जबरा चाहता आहे की त्याने चक्क आपल्या घरात ट्र्म्प यांचे मंदिर उभारले आहे. -
इतकेच नाही तर कृष्णाने आपल्या घराच्या आवारातच ट्रम्प यांचा भलामोठा पुतळाही उभारलाय. कृष्णा या पुतळ्याला दूधाचा अभिषेक घालत असतो.
-
याहून विशेष म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कृष्णा दर शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतो.
-
"भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक चांगले व्हावेत अशी माझी इच्छा आहे. दर शुक्रवारी मी ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतो. मी माझ्याजवळ ट्रम्प यांचा फोटो ठेवतो, आणि कोणतेही काम सुरू करण्याआधी ट्रम्प यांची पूजा करतो", असे बुसा यांनी म्हटले.
-
"ट्रम्प माझ्यासाठी देवासारखे आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे मी त्यांच्या प्रतिमेची स्थापना केली. देवाची पूजा करतो त्याप्रमाणे दररोज मी त्यांची पूजा करतो", असेही बुसा यांनी सांगितले.
-
ट्रम्प यांचा पुतळा उभारायला एक महिना आणि 15 दिवसांचा वेळ लागल्याची माहितीही बुसा यांनी दिली.
-
डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. एक जबरदस्त चाहता म्हणून आपली व ट्रंप यांची भेट घडवून द्यावी आणि माझं स्वप्न सत्यात उतरवावं, अशी विनंती बुसा कृष्णा यांनी केंद्र सरकारकडे केलीये.
-
तर, 'ट्रम्प यांची पूजा करायला सुरूवात केल्यापासून बुसा कृष्णा याला सर्व गावकरी ट्रम्प कृष्णा म्हणून बोलायला लागले', असे बुसा यांचे मित्र रमेश रेड्डी यांनी सांगितले.
गावातील बुसा कृष्णाचं घरही 'ट्रम्प हाउस' म्हणून ओळखलं जातं, असंही रेड्डी यांनी सांगितले. -
डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव बुसा कृष्णाच्या घराच्या प्रत्येक भिंतींवर लिहिलेले आहे.
अनेकांनी विरोध करूनही बुसाचे 'ट्रम्प प्रेम' कमी झाले नाही.

पुण्यात ३ दिवस किडनॅप केलं, मरेपर्यंत मारायला सांगितलं…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…