-
राज्यातील मंदिर खुली करण्यावरून भाजपा आक्रमक झालेली असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावरून चिमटा काढला होता. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे घेतलेल्या भूमिकेचं राजकीय वर्तुळातून आणि समाज माध्यमातून कौतुक झालं होतं. या पत्रासाठी ठाकरे कौतुकाचे धनी ठरले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित साहित्यिकांसह महाराष्ट्रातील १०४ साहित्यिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. (सर्व छायाचित्रं संग्रहित)
-
करोना संसर्गाचा धोका कायम असताना राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी दबाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची जाणीव करून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठितांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रार्थनास्थळे तूर्त बंद ठेवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
-
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, दिलीप प्रभावळकर, जयंत पवार, नीरजा, डॉ. हेमचंद्र प्रधान, विश्वास उटगी, मिलिंद मुरूगकर, मंजिरी मणेरीकर, भारती शर्मा, मुक्ता दाभोलकर, अनिष पटवर्धन, लोकेश शेवडे, सुनील वालावलकर, भूषण ठाकू र यांच्यासह दोन हजार मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्यांत समावेश आहे.
-
"जेव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेव्हा अशी ठाम भूमिका घेणे राजकीय दृष्ट्या कठीण असलं, तरी आपण ती ठामपणे घेतली आणि धर्मनिरपेक्षतेच्या (सेक्युलॅरिझम) बाजूनं उभं राहिलात व त्याची राज्यपालांनाही स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार", असं या मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
-
"घटनेतील धर्म-स्वातंत्र्यासंबधीचे कलम २५ हे आरोग्याला बाधा येत असल्यास आवश्यक ते प्रतिबंध धर्म-स्वातंत्र्यावर लावण्याचा अधिकार सरकारला देतं. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग आक्षेपार्ह आहे. असा श्रद्धांचा उपयोग करून केलेलं राजकारण यशस्वी झाले व त्यातून देवळे उघडली गेली, तर ते भाविकांसाठीच धोक्याचे ठरू शकते", अशी भीती या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
-
हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरातच असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्वच ही परंपरा मानणारे आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतोच पण 'देव देव्हाऱ्यात नाही, देव मूर्तीत ना मावे, तीर्थ क्षेत्रात ना गावे, देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे' अशी माणसाला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणे कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे. सेक्युलर माणूस धार्मिक असू शकतो, श्रद्धाळूही असू शकतो. पण शासनाची भूमिका या श्रद्धेमुळे न ठरता लोकांचे ऐहिक हित लक्षात घेऊन ठरली पाहिजे, असे हा सेक्युलर माणूस मानतो", असं या मान्यवरांनी पत्रात म्हटलं आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'हिंदू व हिंदुत्वाबाबत काही लोक संभ्रम पसरवत आहेत. हिंदुत्वाला संकुचित के ले जात आहे,' अशा मोहन भागवत यांच्या विविध विधानांचा दाखला ठाकरे यांनी दिला. मंदिर, पुजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले. राजकारण म्हणजे शत्रूशी युद्ध नव्हे, विवेक पाळा हा भागवत यांचा संदेशही समजून घ्या. बाबरी मशीद पडली तेव्हा जे बिळात शेपूट घालून बसले होते ते आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत. तुमचे हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारे असेल. पण शिवसेनेचे हिंदुत्व दहशतवाद्यांना बडवणारे आहे, असेही ठाकरे म्हणाले.
-
"मंदिरं उघडण्यासाठी राज्यपालांनी आपल्यावर दबाव आणला आणि 'सेक्युलॅरिझम'ला उघड विरोध केला. या स्थितीत आपल्या शासनापुढे दोन पर्याय होते. एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा वा लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलॅरिझमचे तत्व असं की, लोकांच्या ऐहिक हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील, तर शासनानं ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूनं उभं राहावं. पण राज्यपालांनी तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूनं उभं राहावं, अशी भूमिका घेतली", असंही मान्यवरांनी म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केलं आहे.
-
यापूर्वी राजकीय विश्लेषकांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी, राज्यपालांच्या टिप्पणीवर संकेतभंग व राजकीय आगाऊपणा असल्याची टीका केली. "कोणतेही संकेत पाळायचे नाहीत. कोणत्याही पदाची प्रतिष्ठा ठेवायची नाही, अशा पद्धतीनं सगळं चाललं आहे. राज्यपालांकडे लोक तक्रार करतात. त्यावर रीतसर टिप्पणी लिहून ती सरकारकडे पाठविणे अशी पद्धत असते. पण त्यांनी हा सगळा जो दीडशहाणपणा केला आहे, त्याला संकेतभंग आणि राजकीय आगाऊपणा याखेरीज दुसरे काही शब्द नाहीत. राज्यपालांनी ज्या टिप्पण्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या राजकीय आहेत. ते राज्यपालांनी करणे अपेक्षितच नाही. ते राज्यप्रमुख आहेत. त्यांनी फक्त सरकारला सांगायचे की लोकांनी अशी मागणी केली. तुम्ही याचा विचार करा. मात्र त्यांचे आतापर्यंतचे वर्तन, त्यांच्या वेळोवेळीच्या टिप्पण्या राज्यपालपदाला न शोभणाऱ्या आहेत. राज्यपालपद हे सांविधानिक पद आहे, त्याचा संयम बाळगूनच त्यांनी वागायला हवे. संयम झेपत नसेल तर पद सोडावे आणि उत्तराखंडमधून राजकारण करावं" असं पळशीकर यांनी म्हटलं होतं.
-
(संग्रहित छायाचित्र)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”