बिहारमध्ये सध्या निवडणुकीचं वारं शांत झालं आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल? हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. नितीश कुमार, तेजस्वी यादव, सुशील मोदी आणि चिराग पासवान यांनी आपल्या पक्षासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी सज्ज आहेत…. इंजिनिअर, वीज मंडळात कर्मचारी, केंद्रीय मंत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. जाणून घेऊयात नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासाबद्दल… राजकीय तज्ज्ञांच्या मते नितीश कुमार आपल्या महाविद्यालयीन आयुष्यात जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, सत्यंद्र नारायण सिन्हा आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून प्रभावित झाले होते. यांच्यामुळे नितीश कुमार यांनी राजकारणात यायचं ठरवलं होतं. ११ मार्च १९५१ रोजी बिहारमधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांचा जन्म झाला. १९७२ मध्ये त्यांनी पटनामधील एका कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर बिहार वीज महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून काही काळ नोकरी केली. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी सरकारविरोधात आंदोलनात नितीश कुमार यांनी सहभाग घेतला होता. ६९ वर्षीय नितीश कुमार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७७ मध्ये झाली. जनता दल पार्टीकडून १९७७ मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा विधानसभा निवडणूकीत उतरले. १९८५ मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा बिहार विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. नितीश कुमार यांनी १९८७ मध्ये युवा लोकदल पार्टीचं अध्यक्षपद सांभाळलं. १९८९ मध्ये नितीश कुमार यांची पार्टीच्या महासचिवपदी नेमणूक करण्यात आली. १९८९ मध्येच नितीश कुमार बिहारमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९८९-२००० या कावधीत नितीशकुमार सहा वेळा खासदार राहिले आहेत. १९९० मध्ये नितीश कुमार यांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. त्यांच्याकडे कृषी राज्य मंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर रेल्वे मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाची जबाबदारीही त्यांना सांभाळली आहे. नितीश कुमार यांनी सहावेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००० मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा कार्यकाळ फक्त सात दिवसांचा होता. २४ नोव्हेंबर २००५ ते २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत नितीश कुमार दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होते. २६ नोव्हेंबर २०१० ते १७ मे २०१४ पर्यंत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण १९ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. नितीश कुमार पाचव्यांदा २० नोव्हेंबर २०१५ ते २६ जुलै २०१७ या कालावधीपर्यंत मुख्यमंत्री होते. २७ जुलै २०१७ रोजी सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली. सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी नितीशकुमार भाजपासोबत राजकीय मैदानात उतरले आहेत. नितीश कुमार यांच्या कामामुळे त्यांना बिहारमधील जनता 'सुशासन बाबू' म्हणते. २४ नोव्हेंबर २००५ पासून नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. -
बख्तियारपूरमध्ये मतदानाला उभं राहिलेले नितीश कुमार
-
जयप्रकाश नारायण यांच्यासोबत १९७४ मधील आंदोलनात नितीश कुमार
-
पत्नी मंजू सिन्हासोबत नितीश कुमार

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS