आरजेडीचे युवा नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणताही लागो मात्र, येथील स्थानिकांनी तेजस्वीला आरजेडी पक्षाचं भविष्य मानलं आहे. -
लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणाऱ्या तेजस्वी यादव यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवला.
बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या सभांपेक्षा जास्त गर्दी खेचण्यात त्यांना यश आलं आहे. आज, तेजस्वी यादव यांचा ३२ वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आई राबडीदेवी यांच्यासोबत तेजस्वी यादव यांनी मध्यरात्री केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. तेजस्वी यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराकडे येऊ नका, मतदानावेळी आपल्या भागांमध्ये राहावं, असं आरजेडीने कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. लहानपणापासून तेजस्वी यादव यांना क्रिकेटची आवड आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटसह आयपीएलमध्येही तेजस्वी यादव यांची निवड झाली होती. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून चार वर्ष ते राखीव खेळाडूच होते. त्यांना प्रत्येक्षात मैदानात एकदाही संधी मिळाली नाही. तेजस्वी यादव अष्टपैलू खेळाडू आहेत. दिल्ली U15 संघाचं नेतृत्व करताना त्यांनी पॉली उम्रगर चषक जिंकून दिला आहे. आयपीएल स्पर्धेत चार वर्ष संधीच्या प्रतीक्षेत घालवल्यानंतर तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यांनी निर्णय घेतला. क्रिकेटसाठी तेजस्वी यांनी शाळा अर्धवट सोडली. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी उमेदवारी केली मात्र क्रिकेटमधल्या कारकीर्दीचं स्वप्न प्रत्यक्षात साकारताना दिसेना. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाली. यामुळे तेजस्वी यांना क्रिकेटच्या मैदानातून राजकीय रिंगणात उतरावं लागलं. आरजेडीचा ते चेहरा झाले. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांना मोठा विजय मिळाला होता. नितीश कुमार सरकारमध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. सीबीआयनं २००६ मधील एका प्रकरणात तेजस्वी यांचं नाव घेतलं. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर युती तोडत भाजपाशी हात मिळवला. यादरम्यान, चारा घोटाळ्याचा निकाल लागला आणि जामिनावर बाहेर असलेले लालूप्रसाद यादव पुन्हा तुरुंगात गेले. आरजेडी पक्षाची जबाबदारी तेजस्वी यांच्या खांद्यावर येऊन पडली. तेजस्वी यादव यांनी बिहारच्या विरोधीपक्ष नेत्याचीही भूमिका संपूर्ण ताकदीनं पार पाडली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांची तरुणाईमध्ये क्रेझ असल्याचं दिसतेय. तेजस्वी बिहारच्या रणसंग्रामात नशीब आजमावत असताना दिल्ली पहिल्यांदा आयपीएल जेतेपदाची कमाई करणार का? उद्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामनाही होणार आहे… उद्या काय निकाल लागतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”