-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाने पक्षाचा स्तंभ कोसळल्याची भावना काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेल्या अहमद पटेल यांचं काँग्रेसमधील स्थान मोठं होतं. ते पडद्यामागे राहून काँग्रेस पक्ष संघटनेचं काम करायचे. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
पंचायत समिती सभापतीपदापासून सुरू झालेला अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास काँग्रेसचे संकट मोचक आणि काँग्रेसचे चाणक्य पदापर्यंत पोहोचला. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते लोकसभेत दाखल झालेल्या पटेल यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यासोबत पटेल यांनी जवळून काम केलं. (छायाचित्र/पीटीआय)
-
अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. असंही म्हटलं जातं की, अहमद पटेल यांच्यामुळेच सोनिया गांधी भारतीय राजकारणात पाय रोवून उभ्या राहू शकल्या. पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर तसेच नरसिम्हा राव यांच्यासारख्या नेत्यांसोबतचे नाते बिघडल्यानंतरही सोनिया गांधींनी पक्षाला सावरून नेलं. (छायाचित्र/पीटीआय)
-
अहमद पटेल यांचा जन्म गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये २१ ऑगस्ट १९४९ रोजी झाला. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले. तर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
वडील मोहम्मद इशकजी पटेल यांचं बोट धरून अहमद पटेल राजकारणात आले. मोहम्मद पटेल हे भरूच पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते होते. पुढे अहमद पटेलही पंचायत समितीचे सभापती झाले. काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड दबदबा असलेल्या पटेल यांनी स्वतःच्या मुलांना मात्र, राजकारणापासून दूर ठेवलं होतं. पटेल यांनी मेमून अहमद यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. (छायाचित्र/पीटीआय)
-
आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्याच निवडणुकीत अहमद पटेल संसदेत पोहोचले होते. पटेल यांनी भरूच लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत वयाच्या २६ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
१९८० व १९८४ मध्येही त्यांनी भरूच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. १९८० जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तेव्हा इंदिरा गांधी यांनी पटेल यांना कॅबिनेटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी त्याला नकार देत पक्ष बांधणीच्या कामाला प्राधान्य दिलं. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनी पक्षाची सूत्रं हाती घेतली. १९८४ मध्येही पटेल यांच्याकडे मंत्रीपदाची संधी चालून आली. मात्र, पटेल यांनी त्यावेळी नकार दिला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी युवक काँग्रेसचा विस्तार केला. त्याचबरोबर १९७७ ते १९८२ या काळात गुजरात युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
१९८५ ते १९८६ या काळात पटेल काँग्रेसचे महासचिव होते. १९८६ मध्ये ते गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे नरसिम्हा राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांनी काँग्रेस कार्य समितीवर घेण्यात आलं. ते आतापर्यंत या समितीचे सदस्य होते. (छायाचित्र/नवज्योत सिंग सिद्धू/ट्विटर)
-
१९९६ मध्ये सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना पटेल काँग्रेसचे कोषाध्यक्ष बनले. पुढे सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांसोबत संबंध बिघडल्यानं पटेल यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्यावर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर पटेल यांचं पक्षातील वजन वाढलं. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
पटेल यांना काँग्रेसचे संकट मोचक आणि १० जनपथचा चाणक्य म्हटलं जाऊ लागलं. गांधी कुटुंबीयांच्या सर्वात जवळ असलेल्या व्यक्तींच्या यादीत पटेल यांचं नाव घेतलं जातं असे. स्वतः शांत ठेवणारे पटेल यांचा सल्ला काँग्रेससाठी महत्त्वाचा समजला जायचा. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
२००४ ते २०१४ या कालावधी जेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा अहमद पटेल यांचं राजकीय वजन सगळ्यांना बघायला मिळालं. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
फक्त पक्षाच्या निर्णयातच नाही, तर केंद्रापासून ते राज्यांमधील सरकार स्थापनेत पटेल यांची भूमिका महत्त्वाची असायची. त्या काळात अनेक नेत्यांचं भविष्य पटेल यांनी ठरविलं. (छायाचित्र/एएनआय)
-
पक्षाच्या बैठकीत जेव्हा केव्हा सोनिया गांधी विचार करुन सांग असं म्हणायच्या त्यावेळी असं समजलं जायचं की पटेल यांचा सल्ला घेऊन त्या निर्णय घेणार आहेत. युपीए १ व युपीए २ सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णय पटेल यांच्या सहमतीनंतरच घेण्यात आले होते. (छायाचित्र/एएनआय)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल