-
मी कुठला साधासुधा साप नाही, मी कोब्रा आहे. एक डंख तुमचा जीव घेऊ शकतो… अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच आपल्या या वाक्याने मोठी राजकीय चर्चा घडवून आणली आहे. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांना पक्षात घेण्याचा भाजपाचा पहिला डाव यशस्वी ठरला आहे.
-
पण भाजपाच्या या चालीवर तृणमूल आणि माकपकडून देखील तेवढ्याच परखडपणे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. थेट मिथुन चक्रवर्ती यांच्या पार्श्वभूमीचं भांडवल भाजपविरोधात नक्कीच करण्यात येऊ शकतं. काय आहे मिथुनदांची पार्श्वभूमी?
-
१६ जून १९४७मध्ये जन्मलेल्या मिथुनदांचं खरं नाव गौरांग चक्रवर्ती. १९७६मध्ये त्यांनी 'मृगया'पासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि यासाठी त्यांना अभिनयासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला!
-
१९७० आणि ८०च्या दशकामध्ये भारतातल्या तरुणाईवर मिथुनदा, त्यांची अॅक्शन, त्यांचा रोमान्स, त्यांची 'डिस्को डान्सर' स्टाईल याचं गारूड होतं. १९८९ या एकाच वर्षात १९ सिनेमे प्रदर्शित करण्याचं त्यांचं रेकॉर्ड अजूनही कुणी तोडू शकलेलं नाही!
-
मिथुनदांचं वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य काहीसं वादग्रस्त राहिलं आहे. कॉलेजमध्ये असताना मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाल्याचं सांगितलं जातं. त्याचसाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना कोलकात्याबाहेर पाठवल्याचंही बोललं जातं. मात्र कालांतराने त्यांनी या विचारसरणीपासून फारकत घेतली.
-
मिथुन चक्रवर्ती त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असताना माकपचे दिवंगत नेते सुभाष चक्रवर्ती यांच्या जवळचे मानले जात. मात्र, कालांतराने त्यांनी माकपपासून देखील फारकत घेतली.
-
मधल्या काळात चित्रपटांचा आकडा ३००च्याही वर गेलेले मिथुनदा अचानक २०१४मध्ये राजकीय पटलावर पुन्हा अवतरले. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर मिथुनदा थेट राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून गेले.
-
२०१६मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांचं नाव घेतलं जाऊ लागलं आणि त्यांनी वैयक्तिक आरोग्याचं कारण सांगून राज्यसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. ते शारदा ग्रुपचे ब्रँड अॅम्बेसिडर होते आणि ईडीकडून त्यांची चौकशी देखील झाली होती.
-
२०१२मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारला मदत करण्यासाठी प्रणब मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यात संवाद निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका निभावणारे मिथुनदा शारदा घोटाळ्यानंतर तृणमूलपासून दुरावले.
-
आता २०२१मध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या फक्त १ महिना आधी मिथुन चक्रवर्ती भाजपाचा प्रचार करताना आणि विरोधकांना डंख मारण्याची भाषा करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे मिथुन चक्रवर्तींची सर्व पक्ष फिरून आल्याची राजकीय पार्श्वभूमीवर तृणमूल आणि माकपसाठी आयतं कोलीत मानली जात आहे.

७ एप्रिल पंचांग: बुध मार्गी होऊन ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ आणि सन्मान; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल आनंद; वाचा राशिभविष्य