-
आधी विधान परिषद… नंतर राज्यसभा आणि आता मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना डावलण्यात आल्यानं मुंडे समर्थकांची नाराजी बाहेर पडली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार… प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागलेली वर्णी आणि त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांची समोर आलेली नाराजी. या सर्व राजकीय नाट्यावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पडदा टाकला. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पंकजा यांनी पत्रकार परिषदही घेतली. पण, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले. काय म्हणाल्या पंकजा मुंडे… जाणून घ्या पुढील काही मुद्द्यांमधून…
-
"गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदारकीसाठी राजकारणात आणलं नाही. तर ज्या लोकांना त्यांना उभं केलं त्यांच्यासाठी मला त्यांनी राजकारणात आणलं. त्यांनी मोठ्या उद्देशाने राजकारणात आणलेलं आहे. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी राजकारणात आणलेलं नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक माझं कुटुंब आहेत."
-
"माझ्या वडिलांचा अंत्यविधी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचा असंतोष तुम्हाला आठवतं असेल. लोकांच्या मनात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल प्रेम आहे. मी संघर्ष यात्रा काढली. मी त्यावेळी केलेलं भाषण तुम्ही ऐकलेलं असेल. त्यावेळी मी म्हणाले होते की, माझं भांडण नियतीशी आहे. मी मुंडे यांची वारस आहे आणि मला पद हवंय असं मी कधी म्हणाले का? मंत्रीपद हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार नाहीत. जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं. माझ्याकडे शून्य ताकद होती. पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का?"
-
"माझे नेते मोदी… माझे नेते अमित शाह… माझे नेते जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काहीही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला यशस्वीसाठीही काही नकोय", असं म्हणत "मला भाजपाने विधान परिषदेला अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी त्यांना म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? मी कोण आहे… तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका."
-
"मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. भागवत कराडांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मी त्याचं स्वागत केलं. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, हे धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत."
-
"कोणताही माणूस वैयक्तिक हेतूने कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू."
-
यावेळी पंकजांनी कौरव-पांडव यांच्यातील समरप्रसंगाचं उदाहरण दिलं. "कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नव्हते. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू घेऊन तुम्ही घरी जा. मला का मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही."
-
"आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं मी विसरणार नाही. सगळं कॅबिनेट पंकजा मुंडे होती का? सगळ्यांनाच मंत्रिपद मिळाली. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. मला दिलं, मी ते नाकारत नाही. चंद्रकांत पाटीलही महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. पण मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात", अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
-
"आपल्या जीवनातील स्पिरीट असंच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळलं आहे. तुमचंही मला कळलेलं आहे. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेलं आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचं आहे."
-
"गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचं गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं, तेच स्वप्न आपलंही आहे. पण, इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू", असं म्हणत पंकजा मुंडे वेळ आली तर कठोर निर्णय घेऊ असे संकेत दिले.
-
"भाजपा नेत्यांनीही यावर भाष्य केलं आहे. आम्ही नाराज नसल्याचं आशिष शेलार, राम शिंदे, प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसही बोलले आहेत. आता आणखी कुणी बोलण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे मंजूर नाहीत, ते मागे घेण्यात यावेत, असंही मी सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे ते आपापल्या स्तरावर स्वतःच्या पायावर राजकारणात उभे आहेत. त्यांचे राजीनामे देऊन, दबावतंत्र करण्याची मला गरज नाही. माझ्या नेत्यांशी माझा व्यवस्थित संवाद आहे," असं पंकजा म्हणाल्या.
-
कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धर्मयुद्ध टाळायचं आहे, असं म्हटलं होतं. या धर्मयुद्ध शब्दाबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. "मला डावलल्या जात आहे, अशी लोकांच्या मनात भावना आहे आणि ती तीव्र होत चालली आहे. डावलूनही मी काही करत नाही, असं लोकांना वाटतं. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. मूळात गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता आक्रमक आहे. आम्ही खूप संघर्ष केला. आम्हाला खूप संघर्षातून जावं लागलं. धर्मयुद्ध हे आहे की, माझ्यात आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे."
-
"विधान परिषदेला फॉर्म भरायला लावला आणि रमेश कराडांना तिकीट दिलं. राज्यसभेसाठीही माझी चर्चा असताना भागवत कराडांना संधी दिली. पण, तिथंही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी गेले होते. मग आता मंत्रिमंडळात डावललं असं लोकांना वाटतं आहे. यामुळे कराड आणि इतर नेत्यांशी संबंध खराब होऊन नये म्हणून आम्हाला लढावं लागणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती राज्यभर प्रवास करून संघटन करतो. मग त्यानंतर नेत्याला संघटनेत स्थान नसल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतेय," असं सांगत पंकजांनी आपल्याला डावललं गेल्याचं अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलं.
-
(संग्रहीत छायाचित्र)
-
पंकजांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी, शाह, नड्डा यांचं नाव घेतलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांचं घेतलं नाही. त्यावरही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी यावर उत्तर दिलं. "मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत", असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”