-
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला गेल्या २ दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या भागामधलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
-
रायगडमधील तळई आणि सुतारवाडी या भागांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे ३६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या घटनेवर राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
-
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत
-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रशासकीय यंत्रणा निसर्गाचा कोप झाल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
-
पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून त्यांनी शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तसेच, जीवितहानी होऊ नये आणि पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवले जावे, याला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
-
रायगड, कोल्हापूर, ठाणे अशा पावसाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या माध्यमातून पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-
कोल्हापूरमधली परिस्थिती देखील नियंत्रणाखाली ठेवण्यात आली असून अलमट्टी धरणातून आधीच विसर्ग होत असल्याचमुळे पावसाचं पाणी साचत असताना दुसरीकडे पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाणी कमी देखील होत आहे, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
-
कोल्हापूरमधील संभाव्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफच्या तीन टीम पाठवण्यात आल्या असून त्यांनी बचावकार्य सुरू केल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली आहे.
-
अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या भागांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-
ज्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत यांचा त्यात सामावेश आहे.
-
कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही ते संपर्कात आहेत.
-
अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
-
पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापर्यंत जवळपास ५० हून जास्त बळी गेले आहेत.
-
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स