-
कोकणासाठी पाऊस, वादळ, अतीवृष्टी काही नवं नाही. पण शुक्रवारचा दिवस रायगडमधल्या तळीये गावासाठी काहीतरी वेगळंच नशीब घेऊन आला होता. मायबाप निसर्गाचाच कोप झाला आणि तळीये गाव अक्षरश: होत्याचं नव्हतं झालं! (फोटो – दीपक जोशी)
-
महाड तालुक्यातल्या तळीये गावाचा इतिहास अजिबात दरड प्रवण नव्हता. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते स्पष्ट केलं. पण तरी देखील तिथे दरड कोसळलीच कशी, याचं उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. (फोटो – दीपक जोशी)
-
अजित पवार यांच्यापुढचा हा प्रश्न अगदीच फिका ठरावा, असे भयंकर यक्षप्रश्न तळीयेवासीयांसमोर आज उभे राहिले आहेत. पण अर्थात, जे तळीयेवासी वाचलेत, त्यांच्यासमोर! (फोटो – दीपक जोशी)
-
शुक्रवारचा दिवस आख्ख्या तळीयेसाठीच काळा दिवस ठरला. इतकी वर्ष खंबीर पाठिराख्याप्रमाणे उभा असलेला डोंगर कोप पावला आणि निसर्गानं आपला तिसरा डोळा उघडावा आणि सगळा नि:पात व्हावा अशी अवस्था तळीयेची झाली. (फोटो – दीपक जोशी)
-
जणूकाही डोंगरच धाय मोकलून रडत होता, अशा रीतीने डोंगरावरून भलीमोठी दरड तळीयेवर येऊन कोसळली. संकट 'कोसळणं' म्हणजे नक्की काय असतं, हे तेव्हा फक्त तळीयेनंच नाही, तर उभ्या महाराष्ट्रानं अनुभवलं. (फोटो – दीपक जोशी)
-
दरड कोसळली आणि धणार्धात तळीयेमधली ३२ घरं मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गडप झाली. ही ३२ घरं हा सरकारी कागदपत्रांवर फक्त आकडाच असला, तरी तिथल्या माणसांसाठी ते ३२ संसार होते. (फोटो – दीपक जोशी)
-
दरड कोसळल्यानंतर मलब्याखाली दबलेल्या ३२ कुटुंबांमध्ये नेमके किती लोक होते आणि किती लोक मलब्याखाली दबले गेले असावेत, याचा घटनेनंतर अज ५० तासांनीही नेमका अंदाज बांधता येईनासा झालाय. (फोटो – दीपक जोशी)
-
ही दृश्य शब्दबद्ध करून वाचकांसमोर मांडेपर्यंत तळीयेच्या त्या अजस्त्र मलब्याखालून किमान ३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही ५० हून अधिक लोक दबले असण्याचा अंदाज आहे. (फोटो – दीपक जोशी)
-
शुक्रवारी निसर्ग जणूकाही आपला सगळा संताप तळीयेवरच काढतोय की काय, असा भास व्हावा असा पाऊस कोसळत होता. पण दिवस उतरतीला लागला, तसा पाऊसही उतरतीला लागला. (फोटो – दीपक जोशी)
-
आधी पाऊस आणि पाठोपाठ दरड असा संकटाचा दुहेरी आघात केल्यानंतर निसर्ग विसावला आणि तळीयेवासीयांना श्वास घ्यायला उसंत मिळाली. पण पावसानं जाता जाता मागे जे काही ठेवलं होतं, ते पाहून तिथल्या प्रत्येकाच्या काळजात धस्स झालं असेल. (फोटो – दीपक जोशी)
-
पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर सोशल मीजियावर कुसुमाग्रजांची कणा कविता व्हायरल होत आहे. पण त्यातल्या 'भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले', या ओळींचा साक्षात अर्थ तळीयेवासीयांना समोर दिसत होता. (फोटो – दीपक जोशी)
-
जिथे इतकी वर्ष हाडाची काडं करून संसार केला, तिथे आता फक्त मलब्यातून अधून-मधून डोकावणाऱ्या काडक्या शिल्लक राहिल्या होत्या. (फोटो – दीपक जोशी)
-
आपल्या संसाराच्या वस्तू तर सोडाच, पण दोन दिवसांपूर्वी आपल्या मांडीला मांडी लावून बसलेल्या आपल्या जिवाभावाच्या माणसांचा देखील मागमूस कुणाला दिसत नव्हता. (फोटो – दीपक जोशी)
-
राज्य सरकारने या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयानं देखील २ लाखांची मदत जाहीर केली. पण माणसं आयुष्यभर सोबत करतात, पैसा कुठे करतो? या प्रश्नाचं उत्तर त्यांना कुणी देत नव्हतं. (फोटो – दीपक जोशी)
-
सरकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या रीतसर फेऱ्या झाल्या, मदत करण्यासाठी आसपासचे शेकडो हात देखील हजर झाले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. (फोटो – दीपक जोशी)
-
दरड कोसळली, तेव्हा आभाळच फाटलं होतं. लगेच जीव तोडून शोध घेतला असता, तर मातीच्या ढिगाऱ्याखालून, कुठे दगडाखालून, कुठल्यातरी कोपऱ्यातून कुणीतरी सापडण्याची आशा होती. पण वाढत्या पावसासोबत आणि अधिकाधिक खाली बसणाऱ्या मलब्यासोबत त्यांच्या आशाही कमी कमी होत गेल्या. (फोटो – दीपक जोशी)
-
मदतकार्य, बचाव पथकं वेळेवर पोहोचलीच नाहीत, असा तळीयेवासीयांचा आरोप आहे. या आरोपांमध्ये १० टक्के जरी वास्तव असेल, तर आज झालेल्या प्रत्येक मृत्यूची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडेल. (फोटो – दीपक जोशी)
-
पुन्हा नवी सुरुवात करायला हवी, हे शब्द बोलणं फक्त सोपं वाटतं. पण डोळ्यांसमोर घर-संसाराच्या नावाखाली फक्त पत्रे आणि चार-दोन फळकुटं शिल्लक राहतात, तेव्हा तो शून्य आयुष्यापेक्षाही मोठा वाटायला लागतो. (फोटो – दीपक जोशी)
-
आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी घालावा? (फोटो – दीपक जोशी)
-
आता या ढिगाऱ्यातून आपलं घर, आपली बैठक, आपलं स्वयंपाक घर, आपलं देवघर..कुठून आणि कसं शोधायचं तळीयेवासीयांनी? (फोटो – एएनआय)
-
फक्त काही तासांत गेल्या कित्येक वर्षांची मेहनत मातीमोल झाली. आता शून्यातून सुरुवात करून पुन्हा ती मिळवण्यासाठी किती वर्ष झोकावी लागतील, कुणास ठाऊक! (फोटो – एएनआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”