-
पक्षनिष्ठा आणि विचाराधारा दुर्मिळ होत असलेल्या काळात महाराष्ट्रातल्या एक व्यक्तीनं विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तडा न देता आदर्शवादी परंपरेला जपलं. म्हणून त्यांची कधी आमदारकी गेली नाही. उलट मोदी लाटेतही ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही, तर सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख!
-
काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या आबासाहेबांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या कार्याचा, आत्तापर्यंतच्या प्रवासाचा हा थोडक्यात आढावा.
-
गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले.
-
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले.
-
आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य राहिले.
-
एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी शेवटपर्यंत कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेतला.
-
विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आमदारकीचा कुठलाही रूबाब न दाखवता लोकसेवेचं काम त्यांनी केलं.
-
वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक (२०१९ ची विधानसभा निवडणूक) न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं.
-
आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं. पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच एका पक्षात राहून ते तब्बल ५५ वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर